कितीही विरोध झाला तरी गोव्यात श्रीराम सेना स्थापणारच : मुतालिक
By Admin | Updated: June 26, 2014 01:25 IST2014-06-26T01:22:50+5:302014-06-26T01:25:21+5:30
फोंडा : श्रीराम सेनेचा एकही विभाग गोव्यात अद्याप सुरू झालेला नाही. मात्र, तत्पूर्वीच श्रीराम सेनेच्या बाबतीत दहशत पसरवली जात आहे.

कितीही विरोध झाला तरी गोव्यात श्रीराम सेना स्थापणारच : मुतालिक
फोंडा : श्रीराम सेनेचा एकही विभाग गोव्यात अद्याप सुरू झालेला नाही. मात्र, तत्पूर्वीच श्रीराम सेनेच्या बाबतीत दहशत पसरवली जात आहे. ही एक देशप्रेमी संघटना आहे. तिचे कार्य गोव्यात सुरू झाल्यास काँग्रेस तसेच विद्यमान भाजप सरकारची लाचखोरी, भ्रष्टाचार यांसारख्या कृत्यांत गुंतलेल्यांच्या भानगडी उघड होण्याची भीती सतावू लागली आहे. त्यामुळे काही राजकीय नेते व ख्रिश्चन समुदाय श्रीराम सेनेला घाबरत आहे. मात्र, कोणी कितीही विरोध केला तरी येत्या सप्टेंबरपर्यंत गोव्यात सेनेची शाखा सुरू करणार असल्याचा निर्धार श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी रामनाथी बांदोडा येथे बुधवारी व्यक्त केला. अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या निमित्ताने ते आले होते.
विरोध करणाऱ्यांना तुम्ही तुमची ताकद लावा, आम्ही आमची ताकद लावू, असे उघड आव्हानही मुतालिक यांनी दिले. ते म्हणाले, सात वर्षांपासून श्रीराम सेना देशातील विविध भागांत कायद्याच्या चौकटीत काम करत आहे. तसेच गोव्यातही करेल.
गोव्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या संघटनेवर बंदी घालण्याचे संकेत दिले आहेत. याबद्दल मुतालिक म्हणाले, पर्रीकरांना आपल्याबद्दल चुकीची माहिती मिळाली आहे. येत्या सप्टेंबरपर्यंत आपण त्यांची भेट घेऊन बाजू मांडणार आहे. भाजपात प्रवेश करताच पक्षातून हकालपट्टी झाली, याबद्दल ते म्हणाले, आपण स्वच्छ चारित्र्याचा माणूस आहे. त्यासाठीच आपले पाय ओढण्याचा प्रयत्न होत आहेत.
मागील गोवा भेटीवेळी मुतालिक यांनी प्रत्येक हिंदूने घरात तलवार ठेवावी, असे आवाहन केले होते. याबाबत ते म्हणाले, शस्त्रपूजा ही हिंदूंची संस्कृती आहे. हिंदूंच्या प्रत्येक देवाच्या हातांत शस्त्र आहे. हिंदूंच्या घरात तलवारी ठेवाव्यात ते कोणा मुसलमान किंवा ख्रिश्चन धर्मीयांस मारण्यासाठी नव्हे, तर हिंदू समाज व हिंदुत्वाच्या रक्षणासाठी. पुढील काळात रस्तो-रस्ती दंगे, जाळपोळ होणार, हे निश्चित आहे. त्या काळात स्वसंरक्षणासाठी हिंदूंनी घरात तलवारी ठेवाव्यात. या वेळी सेनेचे कर्नाटकातील कार्यकारी सचिव गंगाधर कुलकर्णी, तामिळनाडू येथील सेनेचे सरचिटणीस अर्जुन संपथ, तसेच हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते रमेश शिंदे उपस्थित होते. (प्रतिनिधी)