१४ हजार उद्योगांना ईडीसीने दिले कर्ज!; मुख्यमंत्री सावंत यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 08:30 IST2025-03-13T08:29:53+5:302025-03-13T08:30:27+5:30
दीड लाख नोकऱ्या निर्माण

१४ हजार उद्योगांना ईडीसीने दिले कर्ज!; मुख्यमंत्री सावंत यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : ईडीसीने आतापर्यंत तब्बल १४ हजार सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना कर्ज वितरित केले. त्यातून दीड लाख नोकऱ्या निर्माण झाल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.
ईडीसीच्या ५० व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्री सावंत यांनी व्टीट् करुन महामंडळाच्या कार्याचा गौरव केला. व्टीटमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, ईडीसीने उद्योगांना दिलेल्या कर्जातून तीन लाख अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. २००१ पासून आजतागायत मुख्यमंत्री रोजगार योजनेखाली ८ हजार जणांना कर्ज मंजूर करण्यात आले आहे. गोव्याच्या आर्थिक विकासासाठी ईडीसीने महत्त्वाचे योगदान दिले असून उद्योजकता शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. विकसित व स्वयंपूर्ण गोवा उभारण्यासाठी ईडीसीकडून सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे काम यापुढेही चालूच राहील. राज्य सरकारने खासगी उद्योगात गोमंतकीय तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी मिळावी यासाठी खासगी अस्थापनांना आदेश दिले आहेत. त्यामुळे गोमंतकीय तरुणांनी कौशल्यपूर्ण शिक्षण घेण्यावर भर द्यावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
दरम्यान, आसाम फायनान्शियल कॉर्पोरेशनने आयोजित केलेल्या दहाव्या कौन्सिल ऑफ स्टेट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया राष्ट्रीय पुरस्काराने भारतातील ५४ उद्योजकांना अलीकडेच सन्मानित केले. यात ईडीसीने वित्तपुरवठा केलेले गोव्यातील पाच उद्योजक होते. ज्यांना उत्कृष्ट उद्योजक म्हणून सन्मानित करण्यात आले.