वास्कोतील दुहेरी खुनाचा गुंता सुटला

By Admin | Updated: February 3, 2015 01:34 IST2015-02-03T01:34:39+5:302015-02-03T01:34:39+5:30

पणजी/वास्को : शुक्रवारी मांगोर हिल येथील एकाच घरातील दुहेरी खून प्रकरणाचा छडा लागल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली;

The double skill level of Vasco was dropped | वास्कोतील दुहेरी खुनाचा गुंता सुटला

वास्कोतील दुहेरी खुनाचा गुंता सुटला

पणजी/वास्को : शुक्रवारी मांगोर हिल येथील एकाच घरातील दुहेरी खून प्रकरणाचा छडा लागल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली; परंतु याबाबत तूर्त गुप्तता पाळून मंगळवारी संशयिताला अटक करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.
या खून प्रकरणात अत्यंत जवळच्या माणसाचा संबंध अधिक दिसून येत आहे, अशी माहिती उपमहानिरीक्षक व्ही. रंगनाथन यांनी दिली. तपास निर्णायक टप्प्यावर आला असून योग्य वेळी सर्व माहिती जाहीर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात मुख्य संशयित म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीनेच खून केल्याचे परिस्थितीजन्य पुरावे आढळून आले आहेत.
सखोल तपासानंतर निश्चित अशा निष्कर्षावर येऊनही याबाबत अद्याप गुप्तता का बाळगली जात आहे, याबद्दल स्थानिकांनी आश्चर्यही व्यक्त केले आहे. सोमवारी मृतांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्यामुळे त्या दिवशी पोलिसांनी कुणाची धरपकड केली नसावी आणि तपासाचा निष्कर्षही जाहीर केला नसावा, अशी शक्यता या प्रकरणी तपासात मदत करणाऱ्या एका कॉन्स्टेबलने व्यक्त केली.
आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मिळविण्यासाठी पोलिसांनी शिकस्त केलेली असून संशयित म्हणून या कुटुंबातील धाकटी सून प्रतिमा प्रवीण नाईक हिची कसून चौकशी करण्यात येत आहे़ त्याचबरोबर तिच्या कुटुंबीयांनाही चौकशी पथकाने सोमवारी वास्को पोलीस स्थानकात आणले होते़
दरम्यान, सोमवारी दुपारी उषा नाईक व डॉ़ नेहा नाईक यांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले़ त्या वेळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने आले होते़ डॉ़ नेहा यांचा पती सिद्धार्थ नाईक रविवारी, तर जखमी झालेल्या प्रतिमा नाईक यांचा पती प्रवीण नाईक विदेशातून सोमवारी सकाळी वास्कोत पोहोचले़ मृतांवर खारवीवाडा येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले़ संशयित प्रतिमा हिच्यावर नजर ठेवण्यासाठी तिच्या घरी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
(प्रतिनिधी)

Web Title: The double skill level of Vasco was dropped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.