भाजपच्या ताब्यातील जागांवर मगोचे वक्तव्य नको: सदानंद तानावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2025 10:02 IST2025-01-13T10:01:54+5:302025-01-13T10:02:46+5:30

मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर आणि भाजप नेते तथा क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांच्यामध्ये सध्या शाब्दिक वाद सुरू आहे.

do not want m g party statement on seats held by bjp said sadanand tanawade | भाजपच्या ताब्यातील जागांवर मगोचे वक्तव्य नको: सदानंद तानावडे

भाजपच्या ताब्यातील जागांवर मगोचे वक्तव्य नको: सदानंद तानावडे

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : प्रियोळ मतदारसंघात भाजपचा आमदार आहे. मगोची तसेच भाजपसोबत युती असल्याने मगोच्या अध्यक्षांनी प्रियोळ मतदारसंघात निवडणूक लढण्याची भाषा करू नये, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सदानंद तानावडे यांनी दीपक ढवळीकर यांना दिला.

मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर आणि भाजप नेते तथा क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांच्यामध्ये सध्या शाब्दिक वाद सुरू आहे. याविषयी प्रदेशाध्यक्ष तानावडे म्हणाले की, भाजप आणि मगो हे युतीचे भागीदार आहेत. २०२७ ची निवडणूक आम्ही एकत्र लढू. पण जागा वाटपावर आताच विधान करणे योग्य होणार नाही. विशेषतः ज्या जागांवर आमचे विद्यमान आमदार आहेत, त्या जागा मगोने मागणे चुकीचे आहे. युतीत असल्याने मगोने अशी जाहीर वक्तव्ये करू नयेत.

निवडणुकीला अजून दोन वर्षे बाकी आहेत. मगो आमचा युतीचा मित्र आहे. त्यामुळे आम्ही ४० मतदारसंघात उमेदवार ठेवू, असे म्हणू शकत नाही. युती केल्यावर जागांचे योग्य वाटप केले जाते. पण आतापासून अशी विधाने केली तर त्याचा फटका बसतो, असेही तानावडे म्हणाले.

जे राजकारणी भाजपमध्ये प्रवेश करतात, त्यांना समान दर्जा दिला जातो. तो नवीन-जुना पाहत नाही. आता थिवी मतदारसंघात मी राजकारण सुरू केले. पण २०१९ मध्ये मंत्री निळकंठ हळर्णकरांनी भाजपत प्रवेश केला. २०२२ मध्ये भाजपच्या तिकिटावर ते निवडून आले. त्यांचे काम चांगले आहे. त्यामुळे मी थिवीत दावा करू शकत नाही, असेही तानावडे म्हणाले.

वाद सोडविला : ढवळीकर 

दरम्यान, दीपक ढवळीकर यांनी 'लोकमत'ला रविवारी सांगितले की, आज सदानंद तानावडे यांच्याशी बोलून आम्ही मगो पक्षातर्फे या वादास पूर्णविराम दिला आहे. मला आणखी काही भाष्य करायचे नाही. तानावडेंशी चर्चा करून विषय सोडविला आहे.
 

Web Title: do not want m g party statement on seats held by bjp said sadanand tanawade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.