खाकीवर डाग पडू देऊ नका: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2025 13:27 IST2025-03-02T13:25:47+5:302025-03-02T13:27:18+5:30
वाळपई पोलिस प्रशिक्षण केंद्रात ४९व्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा

खाकीवर डाग पडू देऊ नका: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, नगरगाव : जनतेचा पोलिसांवरील विश्वास वृद्धिंगत होणे गरजेचे आहे. जनतेच्या विश्वासाला पात्र होणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. भारतीय तिरंग्याला साक्ष ठेवून राष्ट्र प्रथम असे मानून घेतलेली शपथ सेवा बजावताना अखंड स्मरणात ठेवा. कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. तसेच खाकीवर डाग लागेल असे काम करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
वाळपई येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रामध्ये आयोजित ४९ व्या तुकडीचा दीक्षान्त सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर पोलिस महासंचालक अलोक कुमार, प्रा. संतोष देसाई व इतर अधिकारी उपस्थित होते.
आपले वरिष्ठ जी जबाबदारी देतील ती सेवाभावी वृत्तीने बजावणे व आपल्या तिरंग्याचा मान राखणे महत्त्वाचे आहे. खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रशिक्षणार्थीचे अभिनंदन केले.
प्रशिक्षण कालावधीमध्ये उत्कृष्टता सिद्ध केलेल्या सागर वारीक, शुभम नाईक, हॅलोजीयस निकोलस, मयूर नाईक व सत्कार पागी यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रशिक्षणार्थीकडून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना मानवंदना देण्यात आली. मोठ्या संख्येने पोलिस प्रशिक्षणार्थीचे पालक, नागरिक, पोलिस अधिकारी उपस्थित होते.
पोलिसांनी आपल्या पदाचा गैरवापर केला तर त्यांना सेवेतून बडतर्फ केले जाईल. अबकारी खात्यात असे प्रकार घडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कर्तव्य बजावत असताना आई-वडिलांची मान खाली जाऊ देऊ नका. - प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.