लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : नुवे मतदारसंघात भाजपचा मंत्री असूनही पक्षाची समाधानकारक सदस्य नोंदणी होऊ शकलेली नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी प्रथमच मंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
नुवे तसेच अन्य तीन मिळून चार विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप मंडळ अध्यक्ष देऊ शकलेला नाही. नुवेचे आमदार भाजपचे मंत्री असूनही ही परिस्थिती का ओढवली? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता तानावडे म्हणाले की, आमचा मंत्री असूनही नुवेत सदस्य नोंदणीच्या बाबतीत अपेक्षाभंग झाला ही गोष्ट खरी आहे. आमदाराबरोबर लोक का आले नाहीत, हे मला सांगता येणार नाही. त्यावर स्वतः आमदारानेच चिंतन करण्याची गरज आहे. नुवे, वेळ्ळी, बाणावली व मडकई मिळून चार विधानसभा मतदारसंघांमध्ये आम्ही लवकरच मंडळ अध्यक्ष नियुक्त करणार आहोत.
दरम्यान, प्रदेशाध्यक्षपदासाठी दिलीप परुळेकर, दयानंद मांद्रेकर, अॅड. नरेंद्र सावईकर, दामू नाईक, दयानंद सोपटे, बाबू कवळेकर व गोविंद पर्वतकर असे एकूण सातजण इच्छुक आहेत. गोवा भेटीवर आलेले पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांनी या सर्वांशी 'वन टू वन' चर्चा केली. यावेळी सिंग यांनी बूथ समित्या, मंडळ अध्यक्ष निवडणुकीचा आढावा घेतला. येत्या १५ जानेवारीपर्यंत प्रदेशाध्यक्ष जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.
भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी इच्छूक असलेल्या नरेंद्र सावईकर, दयानंद मांद्रेकर, दिलीप परूळेकर, बाबू कवळेकर, दयानंद सोपटे, दामू नाईक आणि गोविंद पर्वतकर यांच्याशी राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांनी चर्चा केली आहे. १५ जानेवारीपर्यंत भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे.
नाराजी का?
नुवेचे फुटीर आमदार आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिपद दिले. त्यामुळे भाजपची मते इथे वाढायला हवी होती. परंतु, गेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपची पूर्णपणे धुळधाण उडाली. भाजप उमेदवाराला केवळ २,६७७, तर काँग्रेस उमेदवाराला तब्बल १६,३६५ मते मिळाली. २०१९च्या निवडणुकीत सावईकर यांना येथे २,५२५ मते मिळाली होती. भाजपची पूर्वी होती तेवढीच मते मिळाल्याने मंत्री सिक्वेरा यांच्या बाबतीत भाजपची घोर निराशा झाली. त्यानंतर नुकत्याच झालेल्या भाजप सदस्य नोंदणीतही सिक्वेरा काहीच सुधारणा दाखवू शकले नाहीत. मंत्री असूनही मतदारसंघात ५० टक्केही सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ते पूर्ण करू न शकल्याने तेथे मंडळ अध्यक्ष नियुक्त करण्याची नामुष्की पक्षावर आली आहे.
कोणाचा दबाव नाही; कोणी नाराजही नाही!
प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानवडे म्हणाले की, मंडळ अध्यक्ष निवडताना ओबीसी, एसटी, एससी या सर्वच समाजांना आम्ही प्रतिनिधीत्व दिले. शिवाय प्रियोळ, कुडतरी व फातोर्डा या तीन मतदारसंघांमध्ये महिला मंडळ अध्यक्षा दिल्या. मंडळ अध्यक्ष निवडताना योग्य प्रक्रिया पार पाडली आहे. या प्रक्रियेत आमदारांचा कोणताही दबाव नाही. सर्वकाही सहमतीने झालेले आहे. काही मतदारसंघांमध्ये या पदासाठी दोन ते तीन नावे होती. परंतु, तिथे कोणतीही नाराजी न ठेवता एकमताने निवड करण्यात यश मिळवले.
१० रोजी अर्ज अन् ११ रोजी निवड होणार
सदानंद तानावडे पुढे म्हणाले की, २०२७च्या विधानसभा निवडणुकीत विरोधक कितीही एकत्र आले तरी भाजपचाच विजय निश्चित आहे. बूथ स्तरापासून सर्व भाजप कार्यकर्ते एकदिलाने काम करत आहेत. येत्या १० रोजी जिल्हा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज घेतले जातील. ११ रोजी दोन्ही जिल्हाध्यक्षांची निवड होईल. त्यानंतर नवीन प्रदेशाध्यक्ष निवडला जाईल. गोव्यात भाजपने ४ लाख २५ हजार सदस्यांची नोंदणी केली आहे.
जिल्हाध्यक्षासाठी सहा नावांची यादी
संघटनात्मक निवडणुकीच्या पुढच्या टप्प्याबद्दल बोलताना राज्यसभा खासदार तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी सांगितले की, दोन्ही जिल्हाध्यक्षपदांसाठी येत्या १० रोजी उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील व ११ रोजी जिल्हाध्यक्ष जाहीर केले जातील. उत्तर गोव्यात रुपेश कामत, दयानंद कार्बोटकर व रायसिंह राणे, तर दक्षिण गोव्यात शर्मंद रायतूरकर, दीपक नाईक व प्रभाकर गावकर अशी दोन्ही जिल्ह्यात प्रत्येकी तीन नावे आली आहेत.