राज्यात डिजिटल जनगणना चाचणी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 08:11 IST2025-11-03T08:11:00+5:302025-11-03T08:11:27+5:30
ही चाचणी १ ते ७ नोव्हेंबर दरम्यान पार पडणार

राज्यात डिजिटल जनगणना चाचणी सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : २०२७ च्या लोकसंख्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्याच्या डिजिटल पूर्वचाचणीला राज्यात प्रारंभझाला आहे. देशभर सुरू असलेल्या या चाचणी मोहिमेत गोवा सहभागी असून, डिजिटल स्वरूपातील स्व-नोंदणी प्रणालीची कार्यक्षमता तपासण्याचे उद्दिष्ट आहे. शनिवारीपासून निवडक भागांमध्ये गणना कर्मचाऱ्यांनी घराघरांत भेटी देत नागरिकांना ऑनलाइन फॉर्म भरताना मार्गदर्शन सुरुवात केले आहे.
ही चाचणी १ ते ७ नोव्हेंबर दरम्यान पार पडणार असून, पेडणे तालुक्यातील कोरगाव आणि मडगाव नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. १६ या दोन ठिकाणी स्व-नोंदणीचा प्रयोग राबवला जात आहे. रहिवासी test.census.gov.in/se या संकेतस्थळावर जाऊन आपली माहिती अद्ययावत करू शकतात. ही भारतातील पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना ठरणार असून, स्वातंत्र्यानंतरची पहिली दशकवार डिजिटल जनगणना असेल. जनगणनेसाठी विकसित करण्यात आलेली मोबाइल अॅप्लिकेशन व ऑनलाइन पोर्टल यांची सध्या क्षेत्रीय पातळीवर कार्यक्षमता चाचणी सुरू आहे.
प्री-टेस्टदरम्यान घरांना सुमारे ३० प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. यात घर क्रमांक, बांधकाम साहित्य, कुटुंबप्रमुखाची माहिती, सदस्यसंख्या, विजेचा वापर, शौचालय, स्वयंपाकासाठी वापरले जाणारे इंधन, पिण्याच्या पाण्याची सोय, तसेच घरातील उपकरणे व वाहन मालकी यांचा समावेश आहे. तसेच, मुख्य धान्याचा वापर, मोबाइल क्रमांक, आणि जात माहिती यांचीही नोंद केली जाणार आहे.
राज्य सरकारने उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती प्रमुख जनगणना अधिकारी म्हणून केली असून, जनगणना संचालनालयाने २७ शिक्षक व सरकारी कर्मचारी यांची गणनाकर्मी व पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. ऑनलाइन स्व-नोंदणी, मोबाइल अॅपद्वारे माहिती संकलन, भू-संदर्भित डिजिटल नकाशे, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित माहिती प्रक्रिया आणि क्षेत्रीय कार्यावर डिजिटल देखरेख प्रणालींचा समावेश आहे.