खाण घोटाळ्यातून दिगंबर कामत दोषमुक्त; जिल्हा सत्र न्यायालयाचा निवाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2025 09:29 IST2025-02-15T09:28:28+5:302025-02-15T09:29:31+5:30
सर्व १६ जण निर्दोष.

खाण घोटाळ्यातून दिगंबर कामत दोषमुक्त; जिल्हा सत्र न्यायालयाचा निवाडा
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील खाण घोटाळ्यातील एका प्रकरणातून माजी मुख्यमंत्री दिगंबर यांच्यासह कामत १६ जणांना पणजी जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी दोषमुक्त केले आहे. यात रवींद्र प्रकाश या खाण व्यावसायिकाचाही समावेश आहे. कामत यांनी मुदत संपवूनही खाण लीज सुरुच ठेवण्यास परवानगी (कॉनडोनेशन ऑफ डिले) दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
२००७ ते २०१२ या काळात कामत हे काँग्रेस सरकारमध्ये मुख्यमंत्री होते. त्यावेळी हा खाण घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलेला. या खाण घोटाळ्याचा तपास सरकारने एसआयटीकडे सोपवला होता. त्यानुसार एसआयटीने कामत व अन्य १६ जणांविरोधात आरोपपत्र सादर केले होते. त्यावर शुक्रवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने सर्वांना दोषमुक्त केले आहे. २०१८ साली एसआयटीने मॅगनम प्रा. लिमिटेडचे संचालक असलेले खाण व्यावसायिक रवींद्र प्रकाश (हरयाणा) यांना दोनापावला येथील त्यांच्या निवासस्थानावरुन अटक केली होती.
या प्रकरणात एसआयटीने न्यायालयात ७०० पानी आरोपपत्र सादर केलेले. २५ साक्षीदारांचाही समावेश होता. खनिज लिजासंबंधीचे सर्व नियम धाब्यावर बसवून कॉनडोनेशन ऑफ डिलेला मंजुरी दिल्याचा तत्कालीन मुख्यमंत्री तथा खाण मंत्री दिगंबर कामत यांच्यावर ठपका एसआयटीने ठेवला होता.
काय आहे प्रकरण?
केपे व सांगे येथील काडणेकर माईन्समधून मॅगनम प्रा. लिमिटेडने बेकायदेशीरपणे खनिज मालाचे उत्खनन केले. त्यानंतर त्यांनी चीन येथे सुमारे २ मिलियन टन खनिजाची निर्यात केली. २००६ ते २०१२ या काळात हे बेकायदेशीर खनिज उत्खनन झाले. मॅगनम कंपनी ही काडणेकर माईन्ससाठी कंत्राटदार होती.
खाण खात्याची तक्रार
या बेकायदेशीर खाण व्यवसाय प्रकरणी खाण खात्याचे तत्कालीन संचालक प्रसन्ना आचार्य यांनी एसआयटीकडे तक्रार केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा प्राथमिक तपास केल्यानंतर एसआयटीने गुन्हा नोंद करुन संबंधितांविरोधात न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते.