खाण घोटाळा प्रकरणात दिगंबर व डॉ. हेदेंविरोधात आरोपपत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 20:15 IST2018-01-18T20:15:02+5:302018-01-18T20:15:39+5:30
लुईस बर्जर कथित लाचखोरी प्रकरणात माजी मुख्यमंत्री व मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी खाण घोटाळा प्रकरणात त्यांच्यामागे लागलेले शुक्लकाष्ठ संपलेले नाही.

खाण घोटाळा प्रकरणात दिगंबर व डॉ. हेदेंविरोधात आरोपपत्र
मडगाव : लुईस बर्जर कथित लाचखोरी प्रकरणात माजी मुख्यमंत्री व मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी खाण घोटाळा प्रकरणात त्यांच्यामागे लागलेले शुक्लकाष्ठ संपलेले नाही. कुळे येथील डॉ. प्रफुल्ल हेदे यांच्या खाणीला कॉन्डोनेशन ऑफ डिलेची बेकायदेशीर सवलत दिल्याचा आरोप ठेवून क्राईम ब्रँचच्या एसआयटीने गुरुवारी कामत यांच्यासह प्रफुल्ल हेदे आणि भूगर्भ शास्त्रज्ञ ए. टी. डिसोझा यांच्या विरोधात फसवणूक व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली मडगावच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
मडगावच्या प्रधान सत्र न्यायालयात गुरुवारी क्राईम ब्रँचचे निरीक्षक उदय नाईक यांनी सुमारे 1572 पानांचे हे आरोपपत्र दाखल केले. 1998 ते 2007 या कालावधीत कामत यांच्याकडे खाण मंत्रीपद असताना त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन डॉ. हेदे यांच्या कुळे येथील बंद खाण कॉन्डोनेशन ऑफ डिलेची सवलत देऊन बेकायदेशीररित्या सुरुवात करण्याची परवानगी दिल्याचा ठपका या आरोपपत्रत ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणात 9 सप्टेंबर 2014 रोजी क्राईम ब्रँचने खाण खात्याने केलेल्या तक्रारीवर आधारित एफआयआर दाखल केला होता. यापूर्वी या प्रकरणात आपल्याला अटक होऊ नये यासाठी कामत यांनी अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. त्यानंतर खास न्यायालयाकडून त्यांना दिलासाही मिळाला होता. गुरुवारी क्राईम ब्रँचने दाखल केलेल्या या आरोपपत्राबरोबर सुमारे 50 साक्षीदारांची सूची जोडली आहे. या प्रकरणात लवकरच कामत व इतर दोघांना न्यायालयात हजर रहाण्यासाठी कोर्टातर्फे नोटीस येण्याची शक्यता आहे.