कळंगुट किना-याजवळ असलेल्या फुटबॉल मैदानाचा होणार विकास
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 22:06 IST2017-10-09T22:05:58+5:302017-10-09T22:06:12+5:30
गोव्यातील कळंगुट किनारी भागात येणा-या पर्यटकांना आता येथील निसर्गाच्या आस्वादासोबत क्रीडा पर्यटनाचा आस्वाद पर्यटकांना मिळणार आहे. त्यासाठी किना-याजवळ असलेल्या फुटबॉल मैदानाचा विकास करुन त्याचे रुपांतर जागतिक दर्जाच्या बहुउद्देशीय मैदानात करण्यात येणार आहे.

कळंगुट किना-याजवळ असलेल्या फुटबॉल मैदानाचा होणार विकास
म्हापसा : गोव्यातील कळंगुट किनारी भागात येणा-या पर्यटकांना आता येथील निसर्गाच्या आस्वादासोबत क्रीडा पर्यटनाचा आस्वाद पर्यटकांना मिळणार आहे. त्यासाठी किना-याजवळ असलेल्या फुटबॉल मैदानाचा विकास करुन त्याचे रुपांतर जागतिक दर्जाच्या बहुउद्देशीय मैदानात करण्यात येणार आहे. आमदार तथा उपसभापती मायकल लोबो यांनी या संबंधीची माहिती पत्रकारांना दिली.
कळंगुट क्षेत्रात फुटबॉल खेळ हा बराच प्रसिद्ध आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले अनेक खेळाडू या मैदानावर तयार केले. या भागात किना-याजवळ असलेल्या फुटबॉल मैदानाचा वापर कैक वर्षांपासून फुटबॉलसाठी करण्यात येत होता; पण वाढत्या पर्यटन व्यवसायामुळे या मैदानाचा वापर खेळासाठी न होता पार्किंगसाठी होऊ लागला. त्यामुळे या भागातील फुटबॉल प्रेमी बरोबर फुटबॉल खेळाडूंवर अन्याय होत होता. त्यावर काहींनी उघडपणे नाराजी सुद्धा व्यक्त केली होती. पार्किंग व्यवस्थेला विरोधही केला होता. वाढत्या पर्यटकांमुळे वाढणारी वाहनांची संख्या व फुटबॉल प्रेमींची वाढती नाराजी लक्षात घेऊन येथील आमदार मायकल लोबो यांनी दोन्ही बाजूनी समाधानकारक तोडगा काढताना या मैदानाचे रुपांत बहुउद्देशीय प्रकल्पात करण्याचे ठरवले आहे.
या संबंधीची माहिती देताना लोबो यांनी सदर मैदानाचा योग्य वापर करण्यासाठी आपण पावले उचलली असल्याची माहिती दिली. या ठिकाणी क्रीडा पर्यटनाला उत्तेजन देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. त्यासाठी दोन तळघर, तळमजला तसेच पहिल्या मजल्यावर पार्किंगची सुविधा उभारण्यात येणार आहे. दुस-या मजल्यावर पर्यटकांसाठी आकर्षक असे शॉपिंग कॉम्प्लेक्स तर तिस-या मजल्यावर जागतिक दर्जाचे फुटबॉल मैदान उभारण्यात येणार आहे. किमार चार हजार लोकांची आसन व्यवस्था या मैदानावर असणार असल्याचे लोबो म्हणाले. विदेशातील ब-याच देशात अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या स्वदेश दर्शन या योजनेखालच्या आर्थिक सहायतेने या प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार असून त्यावर अंदाजीत २०० ते २५० कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे. संबंधीत प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना सादरीकरण केल्यानंतर केंद्रीय मंत्रालयाला त्याचे सादरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार मायकल लोबो यांनी दिली.