बोडगेश्वराच्या जत्रोत्सवाला प्रारंभ; २२ जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2025 09:44 IST2025-01-13T09:43:58+5:302025-01-13T09:44:54+5:30
देवाला श्रीफळ ठेवून, गाऱ्हाणे घालून धार्मिक विधींना उत्साहात सुरुवात

बोडगेश्वराच्या जत्रोत्सवाला प्रारंभ; २२ जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : बार्देशातील राखणदार, गोव्यासह शेजारील राज्यातल्या सर्व जाती-धर्मातील भाविकांसाठी श्रद्धास्थान असलेल्या देव बोडगेश्वरचा ९० वा महान जत्रोत्सव सोहळा रविवारपासून प्रारंभ झाला. देवस्थानचे अध्यक्ष आनंद भाईडकर यांच्या यजमानपदाखाली देवाला श्रीफळ ठेवून, तसेच पारंपरिक पद्धतीने गाऱ्हाणे घालून धार्मिक विधींसह कार्यक्रमांना सुरुवात झाली.
भाविकांची देवदर्शनासाठी गर्दी
देवाच्या दर्शनासाठी दर दिवशी भाविकांकडून सकाळपासून गर्दी केली होती. सकाळी सुरू होणारी गर्दी रात्री उशिरापर्यंत सुरूच असते. काल रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने भाविकांची दर्शनासाठी गर्दी जास्त होती. पार्किंग, तसेच इतर प्रकारची व्यवस्था चोख केली आहे.
जत्रोत्सवात एक हजार स्टॉल्स
अनेक भाविक आपले नवस फेडण्यासाठी येतात. त्यामुळे नवसाला पावणारा देव म्हणूनही बोडगेश्वराला मानले जाते. जत्रेच्या पार्श्वभूमीवर सुमारे ९०० ते १ हजार विविध स्टॉल्सची उभारणी केली आहे. यात घरगुती साहित्यासोबत मुलांची खेळणी, खाद्यपदार्थ, भांडी, कपडे, आदी वस्तूंची विक्री केली जाते. उत्सवात लाखो भाविक दरवर्षी दर्शन घेत असतात. यात मंत्री, आमदार, तसेच प्रशासनातील अधिकारी इतर अनेक मान्यवरांनी देवाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात.
२२ पर्यंत विविध कार्यक्रम
जत्रोत्सवानिमित्त सकाळपासून भाविकांनी देवाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. पुढील ११ दिवस २२ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या उत्सवात, जत्रेनिमित्त विविध धार्मिक विधींचे आयोजन केले आहे. दुपारी आरती, गाहाणे, तीर्थप्रसाद, महाप्रसाद झाला. जत्रेनिमित्त दर दिवशी विविध धार्मिक विधी, सत्यनारायण महापूजेचे आयोजन केले आहे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित • केले आहेत. या संबंधीची माहिती देवस्थानचे अध्यक्ष आनंद भाईडकर यांनी दिली.