‘सनबर्न’, ‘सुपरसोनिक’च्या स्थगितीस कोर्टाचा नकार

By Admin | Updated: December 27, 2014 01:11 IST2014-12-27T01:04:16+5:302014-12-27T01:11:19+5:30

हायकोर्टात याचिका : पुढील सुनावणी १२ जानेवारी रोजी

Denial of 'Sunburn', 'supersonic' adjournment court | ‘सनबर्न’, ‘सुपरसोनिक’च्या स्थगितीस कोर्टाचा नकार

‘सनबर्न’, ‘सुपरसोनिक’च्या स्थगितीस कोर्टाचा नकार

पणजी : सनबर्न व सुपरसोनिक नृत्य महोत्सवांना स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने शुक्रवारी नकार दिला. यासंदर्भात काँग्रेस प्रवक्ते सुनील कवठणकर यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर आता १२ जानेवारीस पुढील सुनावणी होईल.
वागातोर येथे चार दिवस चालणार असलेला सनबर्न आणि कांदोळी येथील सुपरसोनिक नृत्य महोत्सव शनिवार २७ रोजी सुरू होत आहे. पार्टी आयोजकांनी करमणूक कर चुकवेगिरी केल्याचा आरोप करून कवठणकर यांनी स्थगितीची मागणी केली होती. हायकोर्टात न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्यासमोर ही याचिका सुनावणीस आली. तिकीट विक्रीवर २५ टक्के करमणूक कर भरणे आवश्यक असताना तो भरलेला नाही. वाणिज्य कर आयुक्तांकडून तिकिटे प्रमाणित करून घेणे आवश्यक असताना ती न घेताच विकली गेलेली आहेत, असे कवठणकर यांचे म्हणणे आहे.
वैयक्तिक कारणावरून त्यांच्या वकिलाने या खटल्यातून माघार घेतल्यानंतर शुक्रवारी याबाबत कवठणकर यांनी स्वत:च हायकोर्टात युक्तिवाद केला. वेगवेगळ्या दराने तिकिटे विकली गेलेली आहेत, तसेच आॅनलाईन तिकीट विक्रीची कोणतीही नोंद नाही, असे त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणले. या याचिकेत त्यांनी सनबर्न आयोजकांबरोबरच राज्य सरकार, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, वाणिज्य कर खाते आदींना प्रतिवादी केले आहे.
अतिरिक्त सरकारी वकील निखिल पै यांनी सरकारच्या बचावाची बाजू मांडताना सनबर्न आयोजकांनी अंंदाजित तिकीट विक्रीनुसार १ कोटी रुपये आधीच भरले असल्याचे स्पष्ट केले.
(प्रतिनिधी)

Web Title: Denial of 'Sunburn', 'supersonic' adjournment court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.