सिंधुदुर्गातील मासळी आयातीला मुभा नाही; दीपक केसरकरांची मागणी धुडकावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 20:42 IST2018-11-05T20:42:07+5:302018-11-05T20:42:30+5:30
मासळी आयातीवर गोवा सरकारने घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर शेजारी सिंधुदुर्गातील आमदार तथा महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी फोनवरुन येथील आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याशी संपर्क साधला.

सिंधुदुर्गातील मासळी आयातीला मुभा नाही; दीपक केसरकरांची मागणी धुडकावली
पणजी : मासळी आयातीवर गोवा सरकारने घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर शेजारी सिंधुदुर्गातील आमदार तथा महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी फोनवरुन येथील आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याशी संपर्क साधला. सिंधुदुर्गातील मासळी व्यापा-यांना दोन महिने तरी मुभा द्यावी अशी केसरकर यांची मागणी होती परंतु एक दिवसही ही मुभा देता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका राणे यांनी घेतली.
पत्रकार परिषदेत राणे यांनीच ही माहिती दिली. सिंधुदुर्गातील आमदार नितेश राणे यांनी गोवा पासिंगचे एकही वाहन सिंधुदुर्गातून जाऊ देणार नाही, असा जो इशारा दिला आहे त्याचाही विश्वजित राणे यांनी कडक शब्दात समाचार घेतला. अशा धमक्या सहन केल्या जाणार नाही, असे ते म्हणाले.
आयात मासळीसाठी एफडीए नोंदणी आणि इन्सुलेटेड वाहन सक्तीचेच असून याबाबत सरकार माघार घेणार नाही. मासळी विक्रेत्यांनी खुशाल मोर्चे काढावेत, असे त्यांनी स्थानिक मासळी विक्रेत्यांनाही सुनावले. प्रत्येक मासळी बाजारात प्रयोगशाळा उघडण्याची मागणी करणाºयांनी आधी एफडीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असे बजावले.
पत्रकार परिषदेत या विषयावर बोलताना राणे म्हणाले की, ‘आवाहन करुनही एकाही मासळी विक्रेत्याने अजून एफडीए नोंदणीसाठी अर्ज केलेला नाही. विक्रेत्यांना याआधी पुरेसा अवधी दिलेला आहे त्यामुळे आणखी मुदत देणार नाही. मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावेच लागेल.’
दक्षिण गोव्यात प्रयोगशाळा उघडण्यासाठी सरकार जागा शोधत आहे. लवकरच दिल्लीचे क्वालिटी इन्स्पेक्शन कौन्सिलचे दोन अधिकारी गोव्यात येणार आहेत. दुधामधील भेसळीची तपासणीही एफडीएचे अधिकारी करीत आहेत, असे विश्वजित म्हणाले.