'आरजी'चे ठरले; दक्षिण गोव्यातून रुबर्ट परेरा लढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 13:29 IST2023-12-20T13:28:03+5:302023-12-20T13:29:10+5:30
म्हापसा येथील अस्तित्व सभेत मनोज परब यांची घोषणा.

'आरजी'चे ठरले; दक्षिण गोव्यातून रुबर्ट परेरा लढणार
लोकमत न्यूज नेटवर्क म्हापसा : लोकसभा निवडणुकीत संपूर्ण ताकदनिशी रिंगणात उतरण्याचा इशारा देत रिव्होल्यूशनरी गोवन्स अर्थात आरजीने काल दक्षिण गोव्यातून रुबर्ट परेरा लढणार असल्याची घोषणा केली.
आरजीने यापूर्वीच उत्तरेतून मनोज परब लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. पक्षाकडून काल म्हापशातील टॅक्सी स्थानकावर आयोजित केलेल्या अस्तित्व सभेत परब यांनी दक्षिणच्या उमेदवाराचे नाव घोषित केले.
यावेळी भाजपसह काँग्रेसवर टिका करताना लोकांनी आरजीला साथ देण्याचे आवाहन करण्यात आले. गोव्याचे अस्तीत्व राखून ठेवण्यासाठी आज प्रत्येक गोमंतकीयाने एकत्र आले पाहिजे. त्यासाठी आरजीचे व्यासपीठ आम्ही उभे केल्याचे परब म्हणाले.
...तर पक्षच गुंडाळून ठेवेन
आरजी पक्ष त्यांच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर उभा राहिला आहे. नवे नेते पक्षात तयार होत असून प्रत्येक जण लोकांच्या हितासाठी दिवस रात्र झटत आहे. गावागावात आपले कार्यकर्ते काम करत असल्याचे सांगून मते फोडण्याचा होत असलेल्या आरोपाबरोबर लोकांकडून पैसे उकळत असल्याच्या आरोपाचे परब यांनी खंडन केले. आपल्यावर केले जात असलेले आरोप सिद्ध करून दाखवल्यास आरजी पक्षच गुंडळून ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिला.