कर्जमुक्ती योजना आज अधिसूचित
By Admin | Updated: September 1, 2014 02:07 IST2014-09-01T02:06:39+5:302014-09-01T02:07:08+5:30
पणजी : खाण अवलंबित ट्रक, मशिन, तसेच बार्जमालकांसाठी कर्जमुक्तीची योजना सोमवारी (दि. १) अधिसूचित केली जाणार आहे.

कर्जमुक्ती योजना आज अधिसूचित
पणजी : खाण अवलंबित ट्रक, मशिन, तसेच बार्जमालकांसाठी कर्जमुक्तीची योजना सोमवारी (दि. १) अधिसूचित केली जाणार आहे. बार्जमालकांकरिता कर्जाच्या मुद्दल रकमेत ३५ टक्के भार सरकार उचलणार आहे. सरकारला जास्तीत जास्त ४00 कोटी रुपयांची तरतूद करावी लागेल. ट्रकमालकांना किमान १५ लाख व मशिन, तसेच बार्जमालकांना २५ लाख रुपयांपर्यंत फायदा होईल. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राजभवनवर पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
बँकांकडूनही या कर्जधारकांना दिलासा मिळणार आहे. एकरकमी कर्जफेडीसाठी ही योजना अधिसूचित झाल्यानंतर संबंधित बँकांकडून प्रस्ताव मागविले जातील आणि त्यानुसार कर्जमाफी दिली जाईल. ३0 ते ३५ टक्के भार सरकारने उचलल्यास आणि बँकांनीही तेवढीच सवलत दिल्यास केवळ ३0 टक्के स्वत:ची रक्कम भरून ट्रकमालकांना कर्जमुक्त होता येईल. बार्जमालकांच्या डोक्यावर एकूण सुमारे २८0 कोटींचे कर्ज आहे. त्यात सुमारे १६0 कोटी राष्ट्रीयीकृत बँकांचे, ९२ कोटी सहकारी बँकांचे, २0 कोटी वित्तीय कंपन्या व खासगी बँकांचे तर ८ कोटी ईडीसीचे कर्ज आहे. या कर्जावरील व्याजाची रक्कमच ७६ कोटींवर पोहोचली आहे. ट्रकमालकांचे विविध बँकांमध्ये १३0 कोटींचे कर्ज आहे. ही योजना वास्तविक २१ आॅगस्टपर्यंत येणार होती. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत वेळापत्रक जाहीर केले होते. परंतु ती लांबली. दरम्यान, ट्रकांवरील चालक, तसेच इतर कामगारांसाठीही लवकरच योजना येणार आहे. ती २६ आॅगस्टपर्यंत येणार असे जाहीर केले होते; परंतु ते प्रत्यक्षात आले नाही. खाण अवलंबित हॉटेल, गाडे, गॅरेजमालक यांच्याकरिता १५ आॅक्टोबरपर्यंत एकरकमी अर्थसाहायाची योजना येणार आहे. (प्रतिनिधी)