खाण अवलंबितांना कर्जमुक्ती
By Admin | Updated: September 6, 2014 01:25 IST2014-09-05T01:27:36+5:302014-09-06T01:25:36+5:30
पणजी : राज्यातील ज्या खाण अवलंबितांनी ट्रक, टिप्पर, मशिनरी व बार्ज खरेदीसाठी दि. ३० सप्टेंबर २०१२ पूर्वी कर्ज घेतले आहे, त्यांच्यासाठी सरकारने

खाण अवलंबितांना कर्जमुक्ती
पणजी : राज्यातील ज्या खाण अवलंबितांनी ट्रक, टिप्पर, मशिनरी व बार्ज खरेदीसाठी दि. ३० सप्टेंबर २०१२ पूर्वी कर्ज घेतले आहे, त्यांच्यासाठी सरकारने कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. त्याबाबतची अधिसूचना गुरुवारी खाण खात्याकडून जारी करण्यात आली.
सविस्तर अधिसूचना गोवा प्रिंटिंग प्रेसच्या संकेतस्थळावर ३ सप्टेंबरच्या तारखेने उपलब्ध करण्यात आली आहे. सहा महिने
ही योजना अस्तित्वात असेल. एका कुटुंबातील एका व्यक्तीला प्रत्येकी तीन
ट्रक किंवा तीन टिप्पर किंवा तीन मशिनरिज किंवा तीन बार्जवरील कर्जासाठी या योजनेचा लाभ घेता येईल. कर्जधारक व्यक्तीने बँका किंवा अन्य वित्तीय संस्थांकडे एकरकमी कर्जफेड योजनेसाठी अर्ज करावा, त्यानंतर ते कर्ज फेडण्यास सरकार कमाल
३५ टक्के अनुदान देणार आहे. ट्रक व टिप्परवरील कर्ज फेडण्यासाठी १५ लाख रुपये, मशिनरीसाठी २० लाख, बार्जसाठी ३५ लाख किंवा ३५ टक्के अशा प्रमाणात हे अनुदान दिले जाणार आहे, असे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.
बँकांकडे सादर करण्यासाठी अर्जाचा नमुनाही अधिसूचनेसोबत खाण खात्याने दिला आहे. कायमस्वरूपी ठेवींवर जे कर्ज देण्यात आले आहे, त्या कर्जासाठी मात्र ही योजना लागू होणार नाही. कर्जावरील ३० जून २०१२ पूर्वीचे व्याज हे कर्जधारकासच भरावे लागेल.
या योजनेसाठी सरकारने अगोदर दीडशे कोटी रुपयांची व मग अडीचशे कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. सप्टेंबर २०१२ मध्ये राज्याच्या खाण उद्योगावर बंदी आली. त्यानंतर अजूनही खाण व्यवसाय नव्याने सुरू झालेला नाही. बंदीच्या काळात कर्जधारक कर्ज फेडू शकले नाहीत. त्यामुळे प्रत्येकाच्या डोक्यावर बरेच कर्ज जमा झालेले आहे. अशा घटकांना दिलासा देण्यासाठी ही अनुदान योजना असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
(खास प्रतिनिधी)