गोव्यातील वातावरण गेल्या दोन वर्षांत वेगळ्या वळणावर येऊन ठेपले आहे. कुणा एकालाच याबाबत दोष द्यावा, अशी स्थिती नाही. अगोदर सरकारने पोर्तुगीजकालीन राजवटीच्या सर्व खाणाखुणा पुसून टाकण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात गेल्या वर्षभरात किती खाणाखुणा पुसल्या, हा संशोधनाचा विषय आहे. कधी सनबर्न, कधी कॅसिनोंच्या माध्यमातून सरकार आपल्या नव्याच पाऊलखुणा निर्माण करत आहे. भविष्यात जेव्हा कधी खरे भारतीय संस्कृतीप्रेमी सरकार अधिकारावर येईल, तेव्हा त्या सरकारला या कॅसिनो जुगार व सनबर्नग्रस्त पाऊलखुणा आधी मिटवाव्या लागतील आणि मग पोर्तुगीज राजवटीकडे वळावे लागेल.
मध्यंतरी प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी सेंट झेवियर शवाविषयी घेतलेल्या भूमिकेमुळे वाद निर्माण झाला होता. वेलिंगकर माजी गोवा संघचालक आहेत. शिक्षणतज्ज्ञ आणि देशी भाषाप्रेमी आहेत. त्यांनी सेंट झेवियरशी निगडित वादात पडायला नको होते. वाद ओढवून घेतल्यानंतर त्यांच्याविरोधातही पोलिसांत गुन्हा नोंद झाला. त्यांनादेखील अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात धाव घ्यावी लागली होती. नवे वर्ष उजाडताच मडगावच्या दत्ता नायक यांना वेगळीच ऊर्जा आली आणि त्यांनीही वाद निर्माण करणारे विधान केले. वेलिंगकर यांचे वय ७५ हून अधिक, दत्ता नायकांचे वय ७० आणि त्यापूर्वी मराठीविरोधी (?) भूमिका मांडलेले साहित्यिक दामोदर (भाई) मावजो ८० वर्षांचे आहेत. येथे लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे गोव्यातील गरम रक्ताचे तरुण किंवा कुणी किशोरवयीन, कॉलेजकुमार वगैरे वादाचे मोहोळ उठवत नाहीत. वयाची साठी-सत्तरी ओलांडलेले मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारण्याचा डाव खेळत आहेत.
दत्ता नायक अष्टपैलू आहेत. त्यांचे कसदार, दर्जेदार व लालित्यपूर्ण लेखन गोव्याच्च्या कोंकणी व मराठीची शान आहे. राजभाषेचा वाद मिटत असेल तर मराठी व रोमीला राजभाषा करण्यास आपली हरकत नाही, असे विधान त्यांनी केल्यानंतर काही कोंकणीवाद्यांना भलताच राग आला होता. अर्थात, तो विषय वेगळा आहे. गोव्यात काही कोंकणीवादी स्वतःला सेक्युलर म्हणवतात; पण भाषेचा विषय आला की, भाषिक सेक्युलॅरिझम अंगीकारत नाहीत. धर्माचा विषय येतो तेव्हाच ते सेक्युलर, प्रचंड शांतताप्रेमी व अहिंसक होतात. अर्थात, तोही विषय स्वतंत्र आहे. त्यावर ऊहापोह करणे हा आजच्या संपादकीयचा हेतू नाही.
दत्ता नायक हे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक असून, त्यांच्या ताज्या विधानाविषयी मी बोलत आहे. फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशनचा अधिकार सर्वांनाच आहे. व्यक्तिगत स्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य हे तर भारतीय घटनेतील विविध तरतुदींचे तेजस्वी वैशिष्ट्य आहे. मात्र, ही सगळी स्वातंत्र्याची पालखी जबाबदारी नावाच्या मांडवाखालूनच जाते. मतस्वातंत्र्य जबाबदारीच्या चौकटीतच आहे. एखादी व्यक्ती देव मानत नसली तरी समाजातील बहुतांश लोक देव मानतात हे लक्षात घ्यायला हवे. उदाहरणार्थ आपल्यापैकी एखादी व्यक्ती गणेश चतुर्थी साजरी करत नसली तरी, बाकीचे सगळे लोक चतुर्थी खूप भक्तिभावाने साजरी करतात, याचे भान ठेवायला हवे. अर्थात दत्ता नायकांचा विषय थोडा वेगळा असला, तरी त्यावर भाष्य करताना हे सगळे संदर्भ द्यावे लागतात. देवालये किंवा मंदिरे, मठ लुटतात असे विधान करणे वेगळे आणि एखाद्या मठाचे थेट नाव घेणे वेगळे. गोव्यातील मंदिरे किंवा मठ सक्तीने कुणाकडून देणगी उकळत नाहीत. भोंदूगिरी करणाऱ्यांचा विषय वेगळा, इथे खरी आध्यात्मिक साधना करणारे जे मठ, मंदिरे आहेत, त्यांच्याविषयी आम्ही बोलतोय. बोलण्याच्या ओघात एखाद्या मठाचे नाव तोंडी आले तर त्याविषयी माफी मागून विषय संपवता येतो, वाद मिटवता येतो. आणि आपलीच तात्त्विक भूमिका खरी असे वाटते तेव्हा कुणी अटकपूर्व जामिनासाठी जाण्याची गरज नसते.
दत्ता नायक यांनी एका मठाचे नाव घेतल्याने वादाचे मोहोळ उठले. त्यांनी एखाद्या चर्चचे किंवा मशिदीचे नाव घेतले नाही. त्यांनी ते घ्यायला हवे होते असे नाही; मात्र भूमिका समतोल असावी लागते. वेलिंगकरांची सेंट झेवियरप्रश्नी भूमिका चुकीची होती व दत्ता नायकांचे ताजे विधानदेखील लोकांच्या दृष्टीने गैरच ठरले आहे. त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला, हे मात्र चांगले झाले. कारण एक गुणी, सदाचारी लेखक तुरुंगात जाणे समाजासाठी कधीच भूषणावह किंवा अभिमानास्पद नसते.