दत्त जयंती आणि दत्त माहात्म्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2024 08:18 IST2024-12-13T08:18:33+5:302024-12-13T08:18:42+5:30

महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर या दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते.

datta jayanti and datta mahatmya | दत्त जयंती आणि दत्त माहात्म्य

दत्त जयंती आणि दत्त माहात्म्य

संकलन: तुळशीदास गांजेकर, साखळी

मार्गशीर्ष पौर्णिमेदिवशी सायंकाळी मृग नक्षत्रावर दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्तजन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा होतो. यादिनी दत्ततत्त्व पृथ्वीवर अधिक असते. या दिवशी दत्ताची मनोभावे नामजपादी उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळतो. दत्त जयंतीपूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर या दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते.

दत्तजन्माचा इतिहास अत्रीऋषींची पत्नी अनसूया पतिव्रता होती. पातिव्रत्यामुळे तिच्या अंगी एवढे सामर्थ्य आले की, इंद्रादी देव घाबरले. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याकडे जाऊन म्हणाले, 'तिच्या वराने कोणालाही देवांचे स्थान मिळू शकेल' हे ऐकून त्रिमूर्ती म्हणाले, 'किती मोठी पतिव्रता आहे, ते आपण पाहू.' अत्रीऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेल्यावर अतिथींच्या वेशात त्रिमूर्ती आले. अनसूयेकडे त्यांनी भिक्षा मागितली. अनसूयेने सांगितले, 'ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले आहेत. ते येईपर्यंत थांबा.' तेव्हा त्रिमूर्ती अनसूयेला म्हणाले, 'ऋषींना परत यायला वेळ लागेल. आम्हाला खूप भूक लागली आहे. लगेच भोजन द्या, नाहीतर दुसरीकडे जाऊ. 

आश्रमात आलेल्या अतिथींना तुम्ही इच्छाभोजन देता असे आम्ही ऐकले आहे; म्हणून आलो आहोत.' अनसूयेने त्यांचे स्वागत करून जेवायला बसण्याची विनंती केली. ती जेवण वाढायला आल्यावर ते म्हणाले, 'तुझे सुंदर रूप पाहून आमच्या मनात अशी इच्छा झाली आहे की, तू विवस्त्र होऊन आम्हाला वाढावेस.' त्यावर 'अतिथीला विन्मुख पाठवणे अयोग्य होईल. माझे मन निर्मळ आहे, माझ्या पतीचे तपफळ मला तारील', असा विचार केला. स्वयंपाकघरात जाऊन पतीचे चिंतन केले. 'अतिथी माझी मुले आहेत' असा विचार करून विवस्त्र होऊन वाढायला आली.. पाहाते तर अतिथींच्या जागी रडणारी तीन बाळे! त्यांना कडेवर घेऊन तिने स्तनपान करवले आणि बाळांचे रडणे थांबले. 

इतक्यात अत्रीऋषी आले. तिने त्यांना सर्व वृत्तान्त सांगितला. ती म्हणाली, 'स्वामिन् देवेन दत्तं।" अर्थात- 'हे स्वामी, देवाने दिलेली ही मुले.' यावरून अत्रींनी त्यांचे नामकरण 'दत्त' असे केले. बाळे पाळण्यात राहिली आणि ब्रह्मा, विष्णु, महेश त्यांच्यासमोर उभे राहिले. प्रसन्न होऊन म्हणाले, 'वर मागा.' अत्री आणि अनसूयेने 'बालके आमच्याच घरी राहावीत' असा वर मागितला. पुढे ब्रह्मदेवापासून चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शंकरापासून दुर्वास झाले. तिघांपैकी चंद्र आणि दुर्वास तप करण्यास अनुमती घेऊन अनुक्रमे चंद्रलोकी आणि तीर्थक्षेत्री गेले. 

तिसरा दत्त विष्णुकार्यासाठी भूतलावर राहिला. 'श्रीपाद श्रीवल्लभ' हा दत्ताचा पहिला, 'श्री नृसिंह सरस्वती' दुसरा, 'माणिकप्रभू' तिसरा, तर 'श्री स्वामी समर्थ' चौथा अवतार होत. दत्तपूजेसाठी सगुण मूर्तीऐवजी पादुका आणि औदुंबरवृक्षाची पूजा करतात. दत्तात्रेयांना परमगुरू मानले आहे. 'श्री गुरुदेव दत्त' असा त्यांचा जयघोष करतात. 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' ही नामधून आहे.
 

Web Title: datta jayanti and datta mahatmya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.