दामू नाईक, दिगंबर कामत दक्षिणेत भाजप संघटन करणार मजबूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2025 13:34 IST2025-01-23T13:34:18+5:302025-01-23T13:34:48+5:30
भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष दामू नाईक व मडगावचे आमदार दिगंबर कामत दोघेही मिळून दक्षिण गोव्यात भाजप मजबूत करण्यासाठी कामाला लागले आहेत.

दामू नाईक, दिगंबर कामत दक्षिणेत भाजप संघटन करणार मजबूत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष दामू नाईक व मडगावचे आमदार दिगंबर कामत दोघेही मिळून दक्षिण गोव्यात भाजप मजबूत करण्यासाठी कामाला लागले आहेत.
दामू यांचे भंडारी कार्ड यासाठी विशेष उपयोगी येईल. कुडचडेसारख्या मतदारसंघात १३ हजार भंडारी आहेत. शिरोडा तसेच दक्षिण गोव्यातील अन्य काही मतदारसंघांमध्येही भंडारी समाजाचे मतदार मोठ्या संख्येने आहेत.
गेल्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण गोवा मतदारसंघात भाजपच्या पदरी निराशा आली होती. सदस्यता नोंदणी मोहिमेतही चार विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रतिसाद मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर दामूंचे आव्हान वाढले आहे.
दामू हे २००२ आणि २००७ असे दोनवेळा फातोर्डा विधानसभा मतदारसंघातून ते भाजपच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. दामू यांच्या रूपाने सासष्टी तालुक्यातील भाजप नेता प्रदेशाध्यक्ष बनला आहे. याआधी प्रदेश सरचिटणीस म्हणून तसेच पक्ष संघटनेत अन्य महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केलेले आहे.
प्रदेशाध्यक्ष बनल्यानंतर बुधवारी दामू प्रथमच दिल्लीत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेही दिल्लीत असून दामू नाईक पक्षाच्या केंद्रीय नेत्यांची भेट घेणार आहेत.
सासष्टीवर लक्ष
सासष्टीतील प्रदेशाध्यक्ष म्हणून दामू नाईक हे केवळ फातोर्डाच नव्हे तर शेजारी मडगाव, नावेली, कुंकळ्ळी आदी हिंदूबहूल मतदारसंघांमध्ये भाजपचे संघटन वाढवण्यासाठी पक्षाला उपयोगी ठरणार आहेत. दिगंबर कामत यांचे या कामी त्यांना सासष्टीत सहकार्य लाभणार आहेच. शिवाय केपेमध्ये बाबू कवळेकर, काणकोणात सभापती रमेश तवडकर, मुरगांवमध्ये आमदार संकल्प आमोणकर यांची मोठी मदत होणार आहे.
संघटन वाढवणार
भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याशी 'लोकमत'ने संपर्क साधला असता ते म्हणाले की, दक्षिण गोव्यात खास करुन मडकई, वेळ्ळी, नुवे व बाणावली या मतदारसंघांमध्ये आम्हाला संघटन वाढवावे लागेल. ते काम आम्ही करणार आहोत. बुधवारी सकाळी म्हापशात बैठक झाली. पुढील काळात दक्षिण गोव्यातही बैठकांचे सत्र सुरु होईल. फातोर्डा मतदारसंघात भाजपचे अस्तित्त्व नव्हते. आम्ही संघटन वाढवले. २००२ व २००७ साली आम्ही तेथे विजय मिळवला. त्यानंतर कुंकळळीतही भाजपचा विजय झाला. आता नावेलीतही भाजपचा आमदार आहे.