अरबी समुद्रात निर्माण झालेले चक्रिवादळ ‘तेज’
By वासुदेव.पागी | Updated: October 21, 2023 14:19 IST2023-10-21T14:18:07+5:302023-10-21T14:19:11+5:30
चक्रिवादळाला यावेळी मिळालेले ‘तेज’ हे नाव भारताने दिले आहे. यापूर्वीचे बायपरजॉय नाव हे बांगला देशने दिलेले नाव होते.

प्रतिकात्मक फोटो
पणजी : अपेक्षेप्रमाणे अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होऊन त्याचे चक्रिवादळात रुपांतर झाले आहे. चक्रिवादळ ‘तेज’ असे या वादळाचे नावही हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आले आहे. या चक्रिवादळाचा गोव्यावर मोठा परिणाम होणार नसल्याचेही हवामान खात्याने म्हटले आहे.
मान्सूनच्या प्रवेशाच्यावेळी आणि मान्सूनच्या परतीच्यावेळी तापमानात होणाऱ्या आमुलाग्र बदलामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात चक्रीवादळे निर्माण होण्याची फार शक्यता असते. या दरम्यान समुद्रावर निर्माण झालेले कमी दाबाचे पट्टे हे अधिक तीव्र होऊन त्याचे चक्रिवादळात निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. यावेळीही नेमके तसाच प्रकार घडला आहे. १९ ऑक्टोबर रोजी अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा एक दिवस अगोदरच म्हणजे २१ ऑक्टोबरपर्यंत चक्रिदवादळात रुपांतर झाले.
अरबी समुद्रातील घडामोडी प्रमाणेच बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र होऊन बांगला देश किनारपट्टीच्या दिशेने सरकत असल्याचे भारती हवामान खात्याने म्हटले आहे. बंगालच्या उपसागरातील हवामानातील बदलामुळे भारतीय उपखंडातल्या हवामानावर त्याचा परिणाम जाणवणार आहे.
चक्रिवादळाचे नामकरण
चक्रिवादळाला यावेळी मिळालेले ‘तेज’ हे नाव भारताने दिले आहे. यापूर्वीचे बायपरजॉय नाव हे बांगला देशने दिलेले नाव होते. तेज नंतर उष्णकटीबंधीय प्रदेशात आणखी चक्रिवादळ निर्माण झाले तर त्याचे नामकरण हे हमून या इराणी नावाने होणार आहे.