'माझे घर' योजनेच्या अर्जासाठी झुंबड; मुख्यमंत्र्यांचा धडाका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 08:01 IST2025-10-14T08:00:52+5:302025-10-14T08:01:44+5:30
लोकांकडून मिळाला मोठा प्रतिसाद

'माझे घर' योजनेच्या अर्जासाठी झुंबड; मुख्यमंत्र्यांचा धडाका
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सरकारी तसेच कोमुनिदाद जमिनींमधील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी 'माझे घर' योजनेचे अर्ज वितरण काल, सोमवारपासून सुरू झाले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी धडाका लावत पहिल्याच दिवशी चार ते पाच ठिकाणी कार्यक्रम घेतले. राज्यातील प्रत्येक कुटुंबाला घरांचे हक्क सुरक्षित करण्यासाठी तसेच घरांची दुरुस्ती विना अडथळा करता यावी यासाठी सुरू केलेल्या या मोहिमेचा एक लाखाहून अधिक कुटूंबांना लाभ होणार असल्याचा दावा केला जात आहे.
मुख्यमंत्र्यांनी काल मयें, डिचोली, अस्नोडा, म्हापसा व नास्नोळा येथे अर्ज वितरणाचे कार्यक्रम केले. अनधिकृत घरे कायदेशीर करणे, दुरुस्तीसाठीच्या परवानग्या सुलभ करणे आणि विशेषतः आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या घरांच्या समस्या सोडवणे हा यामागचा हेतू आहे.
यापुढे असे प्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. सरकारी जमिनींवर बेकायदेशीर घरे बांधल्याचे आढळून आल्यास ती घरे जमीनदोस्त करण्यास सरकार मागे-पुढे पाहणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
कडक कारवाई होणार
मुख्यमंत्री म्हणाले की, 'सरकार जनतेच्या भल्यासाठी महत्त्वपूर्ण योजना आखत असते. मात्र, काही लोक बेकायदा सरकारी जमिनीवर कब्जा करून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहेत. असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. काही लोक सरकारी जमीन बळकावून घरे बांधण्याचा खटाटोप करीत आहेत. यापुढे सरकारी जमिनींवरील बेकायदेशीर कृत्ये केल्याचे आढळल्यास कडक कारवाई केली जाईल.
एजंटगिरी खपवून घेणार नाही
सरकारने राज्यातील हजारो लोकांना 'माझे घर' योजनेंतर्गत पूर्ण संरक्षण देण्याची भूमिका घेतलेली असताना राज्यातील काही तालुक्यांत सरकारी जमिनी बळकावून त्या ठिकाणी बेकायदेशीर घरे बांधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, माझे घर योजनेचे अर्ज भरताना सर्वाधिक काळजी घ्या. त्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांची मदत घ्या. स्थानिक लोकप्रतिनिधींची मदत घ्या. मात्र, कोणत्याही एजंटांकडे जाऊ नका. तसले प्रकार खपवून घेणार नाही.
नव्याने बांधलेल्या बेकायदा बांधकामांवर कडक कारवाई
सरकारी जमिनी बळकावून बेकायदा घरे बांधण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला. डिचोली येथे माझे घर योजनेंतर्गत लाभार्थीना अर्ज वितरित करण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
आमदार शेट्ये यांनी केले अभिनंदन
आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करताना क्रांतिकारक व प्रत्येक घरात दिलासा देणारी योजना असल्याचे सांगितले. यासाठी मतदारसंघात सातत्याने जागृती केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी नगराध्यक्ष, सरपंच, पंच अधिकारी आदी उपस्थित होते.