Criticism of Iffi's event in Goa | गोव्यात इफ्फीच्या आयोजनावरून टीकेचा सूर; अधिवेशन अर्ध्या दिवसात गुंडाळले

गोव्यात इफ्फीच्या आयोजनावरून टीकेचा सूर; अधिवेशन अर्ध्या दिवसात गुंडाळले

ठळक मुद्देभाजपाचे अनेक कार्यकर्तेही सध्या हे चाललेय काय असे विचारू लागले आहेत. सोशल मिडियावरूनही कार्यकर्ते व्यक्त होत आहेत.

पणजी : सरकार कोविड संकटाचे कारण देऊन राष्ट्रीय क्रिडा स्पर्धाचे आयोजन लांबणीवर टाकते. पण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) मात्र आयोजित करणारच असा आग्रह धरते. यावरून टीकेचा सूर लोकांमध्ये तीव्र होऊ लागला आहे. पणजीला व पूर्ण गोव्यालाही कोविड संकटाने घेरलेले असल्याने व रुग्णांचे मृत्यू थांबविण्याबाबतही सरकार पूर्ण अपयशी ठरलेले असल्याने इफ्फीच्या आयोजनाचा धोका का पत्करला जातो, इफ्फीवर कोट्यवधी रुपये का म्हणून खर्च करावे? असा प्रश्न लोक विचारू लागले आहेत.

कोविडच्या भीतीचे कारण सांगत सरकारने विधानसभा अधिवेशन अर्ध्या दिवसात गुंडाळले. कोविड संकटाबाबतही विधानसभेत चर्चा झाली नाही. केवळ चाळीस आमदार एकत्र येऊन विधानसभा अधिवेशन जास्त दिवस चालवणे हे सरकारला कोविडबाबत धोक्याचे वाटते. पण इफ्फीवेळी देश- विदेशातील हजारो प्रतिनिधी पणजीत येणार आहेत. हे प्रतिनिधी सगळीकडे फिरतील याविषयी सरकारला काही चिंता वाटत नाही. 

सध्या सरकारकडे पैसा नाही व त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठीची गृह कर्ज योजनाही बंद केली गेली. मात्र राज्य सरकार अशावेळी कोटय़वधी रुपये खर्च करून इफ्फीचे आयोजन कसे काय करू पाहते? असा प्रश्न लोकांना पडला आहे. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी इफ्फी आयोजनास आक्षेप घेतला आहे. पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनीही सरकार सोळा कोटी रुपये खर्च करून इफ्फी सध्या का आयोजित करू पाहते, असा प्रश्न विचारला आहे. सरकारी खर्च कपातीच्या गोष्टी मुख्यमंत्री सांगतात. मात्र प्राधान्य इफ्फीच्या आयोजनास देतात. मंत्र्यांना ग्लॅमरचे एवढे आकर्षण आहे काय?अशी विचारणा खंवटे यांनी केली आहे.

भाजपाचे अनेक कार्यकर्तेही सध्या हे चाललेय काय असे विचारू लागले आहेत. सोशल मिडियावरूनही कार्यकर्ते व्यक्त होत आहेत. कोविड संकट काळात इफ्फीचा विचार देखील नको असे भाजपाचे काही प्रमुख पदाधिकारी काही मंत्र्यांना सांगू लागले आहेत. भाजपाच्या एका अनुभवी पदाधिकाऱ्याने ईएसजीवरील काहीजणांशी संपर्क साधला व सध्या इफ्फीच्या आयोजनाविषयी बोलू नका, असा सल्ला दिला आहे.
 

Web Title: Criticism of Iffi's event in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.