राजकारणाचे गुन्हेगारीकरण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2024 11:55 IST2024-12-06T11:54:04+5:302024-12-06T11:55:04+5:30
मांद्रे मतदारसंघातील एक माजी सरपंच महेश कोनाडकर यांच्यावर बुधवारी प्राणघातक हल्ला झाला.

राजकारणाचे गुन्हेगारीकरण?
गोव्यात ग्रामपंचायत स्तरावरून राजकारणाच्या गुन्हेगारीकरणास पंधरा- वीस वर्षांपूर्वी आरंभ झाला होता. मात्र, आता स्थिती गंभीर वळण घेऊ लागली आहे. मांद्रे मतदारसंघातील एक माजी सरपंच महेश कोनाडकर यांच्यावर बुधवारी प्राणघातक हल्ला झाला. पूर्ण गोव्यात त्यामुळे खळबळ उडाली. या घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न आमदार जीत आरोलकर यांच्या विरोधकांनी केला. कोनाडकर यांच्यावर दिवसाढवळ्या ज्यांनी हल्ला केला, त्यांनी म्हणे मायकल यांचे नाव वापरले. म्हणजे तुला मायकल हवा आहे काय?, असा प्रश्न केला. हल्ला करताना असा प्रश्न करून पोलिस तपास वेगळ्याच दिशेने भरकटवण्याचा कदाचित गुन्हेगारांचा हेतू असावा.
पोलिस चौकशी सुरू आहे. अजून काही निष्पन्न झालेले नाही. काल गुरुवारी दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. शिवाय हल्ल्यासाठी क्रमांक पट्टी नसलेली जी कार वापरण्यात आली होती, तीदेखील ताब्यात घेतली. पोलिस त्यांचे काम करतील, पण ग्रामपंचायत स्तरावरील एकूणच राजकारण व आमदारकीच्या स्तरावरील राजकारण याबाबत कधी तरी चर्चा होण्याची गरज होतीच. ती कोनाडकर यांच्यावरील हल्ल्यापासून सुरू झाली आहे. आमदार आरोलकर यांनी या घटनेशी आपला संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. आमदारांनी काल घरी जाऊन कोनाडकर यांची विचारपूसही केली. कोनाडकर यांच्यावर लोखंडी सळ्यांनी हल्ला केल्याचे सांगितले गेले होते, मात्र त्यांची प्रकृती तुलनेने आता बरी आहे. अर्थात घटना खूप गंभीर आहे, पोलिसांनी हल्लेखोरांकडून सत्य माहिती मिळविल्यावर हल्ल्यामागील खरे कारण कळून येईल.
मांद्रेच्या किनारपट्टी भागाला व तेथील डोंगराळ पट्टयाला खूप महत्त्व आलेले आहे. दिल्ली, हरयाणाचे बडे बिल्डर आणि दक्षिण भारतीय सिनेसृष्टीतील काही काळ्या पैसावाल्यांचे लक्ष मांद्रेतील जमिनींवर आहेच. तेथील सरपंच होण्यासाठी अनेक छोट्या-मोठ्या राजकारण्यांमध्ये जीवघेणी स्पर्धा लागलेली असते. ग्रामपंचायत म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी, असे काहींना वाटते. काही तरुण पंच म्हणून निवडून येताच ब्रोकर्सचे काम, जमिनींचे डिलिंग करू लागतात. काहीजण दिल्ली मुंबईच्या बिल्डरना जमिनी दाखवत फिरतात. डोंगर विकण्यासाठी मदत करणे हे काही पंच, उपसरपंच, सरपंच वगैरेंचे कामच झाले आहे. हीच गोष्ट बार्देश तालुक्याच्या किनारपट्टीतही घडते. अर्थात महेश कोनाडकर यांचा अशा व्यवहारांशी संबंध होता किंवा आहे असे कुणी म्हणण्याचे कारण नाही. मात्र, अशा व्यवहारांतूनच बार्देश, मुरगाव किंवा सासष्टी, फोंडा वगैरे काही तालुक्यांमध्ये पूर्वी काही पंच वादाच्या भोवऱ्यात सापडल्याची उदाहरणे आहेत.
काही तालुक्यांत खनिजाची कंत्राटे मिळविण्यासाठी सरपंच, पंच यांच्यात स्पर्धा असते. काही आमदारांमध्येही पूर्वी तशी स्पर्धा असायची, हे नीलेश काब्राल, सुभाष फळदेसाई, गणेश गावकर, दीपक प्रभू पाऊसकर, विनय तेंडुलकर वगैरे सांगू शकतील. काही वर्षांपूर्वी कळंगुटच्या एका सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव आला होता, त्यावेळी जोझफ सिक्वेरा यांच्यावर पंचायतीतच दिवसाढवळ्या सुरी हल्ला झाला होता. त्यावेळी काँग्रेसचा एक नेता तिथे आमदार होता. अर्थात त्या हल्ल्याशी काँग्रेसचा संबंध नव्हता. आता कोनाडकर यांच्यावरील हल्ला राजकीय वैमनस्यातूनच झालाय असा दावा काहीजण करतात. मांद्रेतील काही माजी आमदारांनी किंवा इच्छुक उमेदवारांनी एकत्र येऊन हल्ल्याचा निषेध केला. निषेध करताना त्यांनी आमदार आरोलकर यांच्याकडेही बोट दाखवले. कारण, भाजपचे कळंगुटचे आमदार मायकल लोबो मांद्रेतही राजकीय काम करू पाहत आहेत.
कोनाडकर मायकलचे समर्थक असल्यामुळेच त्यांच्यावर हल्ला झाला, अशा प्रकारची थिअरी मांडण्याचा काहीजणांनी प्रयत्न केला. अजून विधानसभा निवडणुका अडीच वर्षे दूर आहेत. अशावेळी मायकलचा कुणी समर्थक बनला म्हणून त्याच्यावर प्राणघातक हल्ला करावा लागतोय असे सहसा घडत नाही. आमदार लोबो यांचे समर्थक तसे खूपजण असतील, मग सर्वांवर हल्ले झाले काय? येथे सांगण्याचा हेतू एवढाच की- कोनाडकरांवरील हल्ल्यामागील सत्यस्थिती लवकर जनतेसमोर यायला हवी. पोलिसांनी वस्तुस्थिती शोधून काढली तर बरे होईल.