गोवंश हत्याबंदी आणि शैक्षणिक अभ्यासक्रमात श्रीरामचरितमानस लागू करावे; जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज यांची मागणी
By किशोर कुबल | Updated: February 20, 2024 21:57 IST2024-02-20T21:57:29+5:302024-02-20T21:57:55+5:30
प्राचीन तीर्थक्षेत्र श्री शंखावली अंतर्भूत प्राचीन उध्वस्त श्रीविजयादूर्गा मंदिराचे पुनर्निर्माण करणे आणि गोवा राज्याला पुनश्च प्राचीन काळापासून असलेली आध्यात्मिक दैविक पुण्यभूमीची ओळख प्राप्त करून देणे, अशी मागणीही त्यांनी केली.

गोवंश हत्याबंदी आणि शैक्षणिक अभ्यासक्रमात श्रीरामचरितमानस लागू करावे; जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज यांची मागणी
पणजी : गोवा दौय्रावर आलेले अयोध्येच्या तपस्वी छावणीचे पीठाधीश्वर जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज यांनी काल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानी भेट घेऊन राज्यात संपूर्ण गोवंश हत्याबंदी तसेच शैक्षणिक अभ्यासक्रमात श्रीरामचरितमानसचा समावेश करावा यासह आणखी दोन प्रमुख मागण्या केल्या.
परमहंस महाराजांसोबतसंस्थापक श्रीश्री १००० वराह पीठाधीश्वर श्याम नारायण दास महाराज, आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक अध्यक्ष दिनेश पाटील, संस्थापक संघचालक तथा भारतमाता की जय संघ गोवा शाखेचे प्रा. सुभाष भास्कर वेलिंगकर. भारतमाता की जय संघाचे संघचालक गोविंद देव, राज्य सहसंघचालक प्रा.प्रविण नेसवणकर, साखळी तालुका संघचालक दामोदर नाईक, आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे गोवा राज्य अध्यक्ष नीतीन फळदेसाई, सहकार्यवाह गणेश गावडे उपस्थित होते.
प्राचीन तीर्थक्षेत्र श्री शंखावली अंतर्भूत प्राचीन उध्वस्त श्रीविजयादूर्गा मंदिराचे पुनर्निर्माण करणे आणि गोवा राज्याला पुनश्च प्राचीन काळापासून असलेली आध्यात्मिक दैविक पुण्यभूमीची ओळख प्राप्त करून देणे, अशी मागणीही त्यांनी केली.
जगद्गुरू परमहंस आचार्य महाराजांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना प्रसादशाल घालून त्यांचा सन्मान केला. मुख्यमंत्र्यांनीही जगद्गुरू तसेच श्याम नारायण दास महाराजांना शाल, श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतले.
गोवा राज्याला सांस्कृतिक,आध्यात्मिक आयाम व दिशा देण्याच्या दृष्टीने आपल्या सरकारने आतापर्यंत उचललेली पावले व कार्यवाहीचा आलेख मुख्यमंत्र्यांनी या प्रसंगी महाराजांसमोर मांडला, आंतरराष्ट्रीय बजरंग दलातर्फे एक निवेदनही यावेळी मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.