CoronaVirus News: पर्यटकांचे स्वागतच, पण शिस्तीने वागा; महापौरांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 21:30 IST2020-09-16T21:28:37+5:302020-09-16T21:30:33+5:30
मास्क न वापरणार्यांना दंड चालूच राहणार; आतापर्यंत एकूण १७४ जणांना दंड

CoronaVirus News: पर्यटकांचे स्वागतच, पण शिस्तीने वागा; महापौरांचा इशारा
पणजी : गोव्याची 'अतिथी देवो भव'संस्कृती आहे, त्यानुसार आम्ही पर्यटकांचे स्वागतच करतो. परंतु त्यांनी शिस्तीत वागायला हवे. तोंडावर मास्क न बांधणाऱ्या पर्यटकांना महापालिका दंड चालूच ठेवणार आहे, असा इशारा महापौर उदय मडकईकर यांनी दिला.आतापर्यंत एकूण १७४ जणांना दंड ठोठावला असल्याचे त्यांनी सांगितले.
महापौर म्हणाले की, शुक्रवार, शनिवार, रविवार अशा विकेंडला पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. १ सप्टेंबरला सीमा खुल्या झाल्यानंतर पर्यटक मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत. आम्ही त्यांचे स्वागतच करतो, परंतु त्यांनी महामारीची मार्गदर्शक तत्वें पाळायलाच हवीत. मास्क तोंडावर बांधणे हे केवळ गोव्यातच सक्तीचे नाही तर देशभर आणि जगभरात सक्तीचे आहे. पर्यटकांचे बिंधास्त वागणं बरे नव्हे! महापालिका कोविडचा प्रसार होऊ नये, यासाठी दिवसाचे दिवस-रात्र करते आहे. कोविड बाधित लोक घरीच विलगीकरणात रहात असल्याने कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. बाधीतांच्या घरी कचरा संकलनासाठी खास कामगार पाठवावे लागतात. या सर्व गोष्टी आम्ही फैलाव होऊ नये यासाठी करतो आणि पर्यटक अशा बिनधास्त वागण्याने कोविडचा प्रसार करण्यास प्रवृत्त होत असतील तर ते सहन केले जाणार नाही. महापालिकेचे निरीक्षक आता साध्या वेशात किनार्यावर तसेच राजधानीतील पर्यटन स्थळांवर फिरतील आणि मासृक परिधान न करणाऱ्या किंवा मार्गदर्शक तत्त्वांचे कोणत्याही पद्धतीने उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करतील. मडकईकर म्हणाले की, आम्हाला शंभर रुपये दंड नको आहे. परंतु पर्यटकांनी शिस्तीने वागायला हवे आणि कोविडचा प्रसार होऊ नये यासाठी दक्षता घ्यायला हवी एवढेच आमचे म्हणणे आहे.