CoronaVirus News : गोव्यात कोरोनाचा सामूहिक संसर्ग, मुख्यमंत्र्यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 21:16 IST2020-06-26T21:15:53+5:302020-06-26T21:16:24+5:30
CoronaVirus News : गोव्यात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता एक हजारहून जास्त झाली आहे.

CoronaVirus News : गोव्यात कोरोनाचा सामूहिक संसर्ग, मुख्यमंत्र्यांची माहिती
पणजी : राज्यात कोरोनाचा सामूहिक संसर्ग सुरू असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी प्रथमच येथे जाहीर केले. अनेक रुग्ण बरे होत आहेत पण नवे रुग्णही अनेक ठिकाणी आढळत आहेत. शुक्रवारी 44 नवे रुग्ण आढळले, 35 रुग्ण बरे झाले.
गोव्यात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता एक हजारहून जास्त झाली आहे. गुरुवारपर्यंत एकूण संख्या 995 होती. त्यात शुक्रवारी 44 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे एकूण संख्या 1 हजार 39 झाली. मात्र त्याचबरोबर एकूण 370 कोरोनाग्रस्त आजारातून बरे झाले आहेत. यामुळे सक्रीय असे कोरोनाग्रस्त सध्या 667 आहेत.
मुख्यमंत्री सावंत येथे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, की राज्यात सगळीकडे कोरोनाचा सामूहिक संसर्ग सुरू आहे. मात्र लोकांनी सहकार्य केले तर आम्ही कोरोनावर नियंत्रण ठेवू शकू. तोंडाला मास्क बांधणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, सॅनिटायझरचा वापर करणे अशा पद्धतीने लोकांचे सहकार्य हवे आहे.
एका व्यक्तीपासून दुस-या व्यक्तीला कोरोनाची लागण होत आहे. सर्वच तालुक्यांमध्ये कोरोनाग्रस्त व्यक्ती आढळत आहेत. त्यामुळे काळजी घ्यावी लागेल. आता कोरोनाचा संसर्ग हा केवळ स्थानिक संसर्गापर्यंत मर्यादित राहिलेला नाही तर सामूहिक संसर्ग सुरू आहे. हे सरकार मान्य करते.
गोव्यात सगळीकडेच कोरोनाचे रुग्ण आढळून येऊ लागल्याने आम्ही आता हा स्थानिक स्तरावरील संसर्ग आहे, असे म्हणणार नाही. हा सामूहिक संसर्ग आहे. मात्र अनेकजण बरे होत आहेत. दरम्यान, गेल्या चार दिवसांत सुमारे दोनशे कोरोनाग्रस्त आजारातून बरे झाले.