विकसित भारतासाठी युवकांचे योगदान महत्त्वपूर्ण: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 12:48 IST2025-07-08T12:47:19+5:302025-07-08T12:48:08+5:30
साखळीत 'आकाश' तर्फे टॉपर्स विद्यार्थ्यांचा गौरव

विकसित भारतासाठी युवकांचे योगदान महत्त्वपूर्ण: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : गोव्यात असलेल्या दिल्लीस्थित एका पशुवैद्यकीय लहान प्राण्यांच्या इस्पितळातील डॉक्टरांना एमबीबीएस डॉक्टारांप्रमाणेच पगार मिळतो. त्यासाठी या क्षेत्राकडेही विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी गांभीर्याने पाहावे. विकसित भारतासाठी युवकांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
साखळी रवींद्र भवनात आकाश मेडिकल, आयआयटी-जेईई फाऊंडेशनतर्फे नीट व जेईईमध्ये उत्कृष्ट यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यात ('चॅम्पियन्स ऑफ आकाश') मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आकाश फाऊंडेशनचे मुख्य शैक्षणिक आणि व्यवसाय प्रमुख डॉ. एच.आर. राव व इतरांची उपस्थिती होती.
आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेडचे मुख्य शैक्षणिक आणि व्यवसाय प्रमुख, डॉ. एच. आर. राव म्हणाले की, आकाशमध्ये आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना नवीन परिस्थितींमध्ये कसे जुळवून घ्यायचे हे शिकवतो. म्हणूनच यावर्षी देखील आमच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश मिळवले. नीट २०२५ ची पद्धत फक्त वेगळी नाही, तर कठीण देखील होती. पण नवीन पद्धती किंवा नवीन आव्हानांना सामोरे जात पुन्हा समस्या सोडवण्याची कला शिकल्यास तुम्ही कोणत्याही परीक्षेत यश मिळवू शकता, असे ते म्हणाले.
विज्ञान क्षेत्रात संधी
येणाऱ्या काळात संशोधनात, नावीन्यपूर्ण, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देश पुढे जाणार आहे. हा देश वैश्विक महासत्ता होत असताना कसा असावा, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष असायला हवे. केवळ एमबीबीएस म्हणून घेऊन बसून होणार नाही. विज्ञान क्षेत्रात शिकाणारे विद्यार्थी चांगली संधी मिळवू शकतात. पालकांनीही विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे क्षेत्र निवडण्यासाठी मोकळीक द्यावी. त्यांच्यावर आपल्या स्वप्नांप्रमाणे आवडीच्या क्षेत्रांसाठी दबाव घालू नये. हे विद्यार्थी विकसित भारताचे शिल्पकार असणार. त्यासाठी आपण मर्यादित राहू नये. हे सर्व करताना आपण आपले चांगले व्यक्तिमत्व निर्माण करणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले.