लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : काँग्रेसला मी पाच वर्षे स्थिर सरकार दिले, परंतु मी कायद्याच्या कचाट्यात सापडलो तेव्हा त्याच काँग्रेसने मला कोणतीच मदत केली नाही. मला सत्ता हवी असती तर सप्टेंबर २०२२ पूर्वीच भाजपमध्ये गेलो असतो. काँग्रेसने २०२२ साली व नंतरही मला माझे योग्य स्थान दिले नाही, अशी खंत मंत्री दिगंबर कामत यांनी काल व्यक्त केली.
दिगंबर कामत यांनी २००५ साली प्रथम भाजप सोडला होता, तेव्हा त्यांनी आपली भाजपमध्ये घुसमट झाली होती अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली होती व स्वतःच्या कृतीचे स्पष्टीकरणही दिले होते. काल मात्र कामत यांनी प्रथमच जाहीरपणे काँग्रेसला दोष दिला.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. आपण पाच वर्षे स्थिरपणे सरकार चालून दाखवले पण आपल्याला २०२२ साली काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केले नव्हते. आपल्याला विरोधी पक्षनेते पदाऐवजी आम्ही अन्य काही तरी देऊ पाहतो असे मला काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले होते, पण तसे काही घडले नाही, असे काल कामत म्हणाले.
अर्थात २०१२ सालच्या निवडणुकीवेळी गोव्यात काँग्रेसचे पानिपत झाले होते व त्यानंतर मात्र काँग्रेस आमदारांची संख्या वाढली होती, पण २०१७ साली लुईझिन फालेरो व कामत यांच्यातील नेतृत्वाच्या विषयामुळे गोव्यात सरकार स्थापन होऊ शकले नव्हते, असे राजकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे. काल कामत यांनी या विषयाला स्पर्श केला नाही.
काँग्रेसने मुख्यमंत्रिपद देऊनही त्या पक्षाशी प्रतारणा केली, असे वाटत नाही का? यावर ते म्हणाले की, काँग्रेसने २०२२ मध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून माझे नाव जाहीर केले नाही. मला विरोधी पक्षनेतेपदही दिले नाही. काँग्रेसने मला बाहेर टाकल्यासारखे केले.
पर्रीकर व सावंत यांच्यात नेतृत्वगुण व एकूणच बाबतीत आपण काय फरक पाहता आहात ? असा प्रश्न केला असता कामत म्हणाले की, पर्रीकर बुद्धिमान माणूस होते. मला ठाऊक नाही की त्यांच्या मनात माझ्याबद्दल काय भावना होत्या. जो माणूस हयात नाही त्याच्याबद्दल बोलणे योग्य नाही. माझ्या मनात कोणतीही कटुता नाही. लोक मला देवाचा माणूस म्हणतात. देवाचा माणूस कटू कसा असू शकतो?
भाजप प्रवेशावेळी मंत्रिपदाचे आश्वासन दिले होते का? या प्रश्नावर कामत म्हणाले की, सप्टेंबर २०२२ मध्ये भाजप प्रवेशावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मला बोलावून घेत काय हवे? असे विचारले होते. माझ्या जागी अन्य कोणी असता तर मागितले असते. मी माझे भवितव्य तुमच्या व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात सोपवतो, एवढेच सांगून मी गोव्यात परतलो. आज माझा मंत्रिपदाने यथोचित सन्मान झालेला आहे. नशिबात असेल तर कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.
मडगावमध्ये मी भक्कम
२०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी मडगावमध्ये अनेकांनी कंबर कसली आहे. तुम्ही याकडे कसे पाहता, याबद्दल विचारले असता कामत म्हणाले की, मडगावकर आणि दामबाबच्या आशीर्वादाने मी भक्कम आहे. अनेकजण आले आणि गेले. जोपर्यंत मला मडगावच्या लोकांचा पाठिंबा आणि दामबाबचा आशीर्वाद आहे तोपर्यंत कोणीही माझ्याविरुद्ध निवडणूक लढवली तरी मला त्याची पर्वा नाही.