मडगावच्या जिल्हा इस्पितळ खासगीकरणास काँग्रेसचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 10:36 PM2019-12-06T22:36:26+5:302019-12-06T22:36:34+5:30

मडगाव येथील नव्या जिल्हा इस्पितळाच्या खासगीकरणास प्रदेश काँग्रेसने जोरदार विरोध दर्शविला आहे.

Congress opposes Madgaon district hospital privatization | मडगावच्या जिल्हा इस्पितळ खासगीकरणास काँग्रेसचा विरोध

मडगावच्या जिल्हा इस्पितळ खासगीकरणास काँग्रेसचा विरोध

googlenewsNext

पणजी : मडगाव येथील नव्या जिल्हा इस्पितळाच्या खासगीकरणास प्रदेश काँग्रेसने जोरदार विरोध दर्शविला आहे. लवकरच उद्घाटन होणार असलेले हे इस्पितळ सार्वजनिक-खासगी (पीपीपी) तत्त्वावर चालविण्यास देण्याचा हेतू शुद्ध नाही. यामागे आर्थिक व्यवहार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सरकारने आधी पीपीपी धोरण जाहीर करावे, अशी मागणी पक्षाने केली आहे. 

पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले की, ‘ गोमेकॉसारख्या सरकारी इस्पितळामध्ये एवढ्या दर्जेदार सुविधा आहेत की शेजारी राज्यातील लोकही उपचारांसाठी येथे येतात. गोव्यात खासगी इस्पितळांमध्ये डायलिसीस तसेच हृदयरोगावरील उपचारासाठी कॅथलॅब सुरू करण्यात आल्या. परंतु खासगी व्यवस्थापनांना त्या बंद कराव्या लागल्या. गोमेकॉसारखे सरकारी इस्पितळ चांगली वैद्यकीय सेवा देऊ शकते तर हे जिल्हा इस्पितळ का नाही?, असा चोडणकर यांचा सवाल होता.

सरकारने गरीब जनतेला नजरेसमोर ठेवून प्रत्येक क्षेत्रात कल्याणकारी सेवा द्यायला हवी. खासगीकरणामुळे लोकांना पैसे बाहेर काढावे लागणार. सर्वच लोकांना हे परवडते असे नाही. चोडणकर म्हणाले की,‘ मडगाव येथे सुरू होणार असलेल्या जिल्हा इस्पितळासाठी २00 कोटी रुपयांहून अधिक सरकारने गुंतविले आहेत. २५ कोटींची जमीन, बांधकामासाठी १५0 कोटी, ३0 कोटींची वैद्यकीय उपकरणे, हा सर्व खर्च सरकारी तिजोरीतून करण्यात आला आहे. पीपीपी तत्त्वावर हे इस्पितळ चालविण्यासाठी पुढे येणा-या कंपनीला आयतेच सर्व मिळणार आहे. कंपनीकडे ३३ वर्षांसाठी समझोता करार किंवा ९९ वर्षांकरिता लीज करार करण्याच्या हालचाली चालू आहेत.

पीपीपी मॉडेलच्या माध्यमातून जनतेच्या पैशावर डल्ला मारण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.’ चोडणकर म्हणाले की, विश्वजित यांचे पिता प्रतापसिंह राणे यांनी काँग्रेस सत्तेत असताना अनेक वर्षे मुख्यमंत्रीपद भोगले आहे. कदंब बससेवा असो की शिक्षण क्षेत्रात गरीबांना सवलती असोत त्यांनी नेहमीच कल्याणकारी निर्णय घेतले. विश्वजित मात्र नेमके उलट वागत आहेत. पत्रकार परिषदेस प्रदेश काँग्रेसच्या माध्यम विभागाचे संवाद प्रमुख ट्रोजन डिमेलो, काँग्रेसे सेवा दलाचे गोवा प्रमुख शंकर कीर्लपालकर, कुंभारजुवें गटाध्यक्ष विशाल वळवईकर आदी उपस्थित होते. 

Web Title: Congress opposes Madgaon district hospital privatization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.