राज्यात काँग्रेस बळकट होणे अशक्य

By Admin | Updated: May 20, 2014 01:39 IST2014-05-20T01:31:25+5:302014-05-20T01:39:13+5:30

पणजी : काँग्रेसचे काही आमदार हे नेहमीच बेभरवशाचे आणि चंचल मनस्थितीचे राहिल्यामुळे काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनाही काही आमदारांबाबत चीड आहे.

Congress is not able to strengthen the state | राज्यात काँग्रेस बळकट होणे अशक्य

राज्यात काँग्रेस बळकट होणे अशक्य

पणजी : काँग्रेसचे काही आमदार हे नेहमीच बेभरवशाचे आणि चंचल मनस्थितीचे राहिल्यामुळे काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनाही काही आमदारांबाबत चीड आहे. गोव्यातील काँग्रेसला त्यांनीही गंभीर घेणे आता सोडून दिले आहे. बेभरवशाच्या आमदारांमुळेच काँग्रेस गोव्यात नजीकच्या काळात तरी बळकट होणे हे जवळजवळ अशक्य बनले आहे. लोकसभा निवडणुकीवेळी गोव्यातही काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याने आणि सासष्टीसह अन्य सर्व भागांमध्ये भाजपने बर्‍यापैकी मते मिळविल्याने काँग्रेस पक्ष संघटनेच्या अस्तित्वाबाबत आता पक्षात गंभीरपणे विचार होऊ लागला आहे. जॉन फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखालील नवी प्रदेश काँग्रेस समिती गोव्यात आता काँग्रेस पक्ष कसा बळकट करायचा यावर विचार करत आहे. गेली दोन वर्षे पर्रीकर सरकार अधिकारावर आहे. या सरकारच्या कारभारातील दोष अनेकदा जनतेसमोर मांडूनदेखील लोकांनी मोठ्या प्रमाणात भाजपला मते देऊन पर्रीकर सरकारवर विश्वास दाखविल्याने काँग्रेस पक्ष संघटनाही हताश व असाहाय्य झाली आहे. काँग्रेसचे काही आमदार गट समित्या स्थापन करत नाहीत, आपल्या मतदारसंघात पक्षाचे मेळावेही घेत नाहीत आणि प्रदेश काँग्रेस समितीच्या बैठकांनाही उपस्थित राहत नाहीत. फक्त तिकीट मिळविण्यापुरताच काही आमदारांचा काँग्रेसशी संपर्क असतो. काही आमदार तर कधी मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या तर कधी भाजप नेत्यांच्या कायम संपर्कात असतात, काँग्रेसपेक्षा त्यांची निष्ठा इतरत्रच अधिक असते. अशा प्रकारच्या आमदारांना घेऊन पक्ष संघटना गोव्यात बळकट होणार नाही, असे काही पदाधिकार्‍यांनी सांगितले. गोव्यातील लहान-मोठे प्रश्न हाती घेऊन पक्षाने आंदोलने करण्याची गरज आहे; पण आमचा पक्ष ते काम करत नाही. केंद्रातील यूपीए सरकारने स्वयंपाक गॅसच्या विषयांसह अनेकबाबतीत लोकविरोधी निर्णय घेतल्यानेही आम्ही मार खाल्ला, असे काही पदाधिकारी म्हणाले. काही आमदार फक्त सत्तेतच राहू पाहतात. आता लोकसभा निवडणुकीचा निकाल विरोधात गेल्यानंतर काही आमदार अस्वस्थ व हवालदिल झाले आहेत. (खास प्रतिनिधी)

Web Title: Congress is not able to strengthen the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.