विकासकामे पाहूनच काँग्रेसचे आमदार भाजपात: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2025 07:51 IST2025-01-04T07:51:18+5:302025-01-04T07:51:56+5:30
कुडतरी येथील विविध विकासकामांची केली पायाभरणी

विकासकामे पाहूनच काँग्रेसचे आमदार भाजपात: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : काँग्रेस पक्ष म्हणून निवडून आल्याने आमदारांना कोणत्याही मतदारसंघात विकासाची हमी मिळत नाही. भाजप सरकार करत असलेली विकास कामे पाहूनच अनेक काँग्रेसचे आमदार भाजपात आले, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
शुक्रवारी सायंकाळी कुडतरी येथे विविध कामांचे मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते आभासी पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत पर्यटनमंत्री रोहन खंवटे, जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड, कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, काँग्रेस पक्षातून निवडून आल्याने मतदारसंघातील विकासाची हमी मिळत नाही. त्यामुळे अनेक आमदार भाजपसोबत आले आहेत.
कुडतरीच्या जनतेने रेजिनाल्ड यांच्या रुपात योग्य निवड केली आहे. ते ज्येष्ठ आमदार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते लोकांसाठी आणि त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी लढत आहेत. काँग्रेस पक्षात असताना त्यांनी विकासकामांची पायाभरणी केली नसेल. मात्र भाजप सरकारमध्ये अपक्ष आमदार असतानाही त्यांनी विकास पाहिला आहे.
जे आमदार काँग्रेसमधून भाजपात आले होते, त्यांना कळले आहे की काँग्रेसमध्ये राम राहिलेला नाही. आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजपशिवाय पर्याय नाही, हे कळल्यावर ते भाजपमध्ये आले, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.