लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गेल्या कित्येक वर्षानंतर आता सांताक्रूझ मतदारसंघात विकास होताना दिसत आहे. आमदार रुदोल्फ फर्नाडिस हे काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्यानंतर हा विकास झालेला आहे. काँग्रेसच्या माजी आमदार व्हिक्टोरिया फर्नाडिस (मामी) यांना असाच विकास हवा होता, पण काँग्रेसने त्यांना कधीच सहकार्य केले नाही. उलट प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना त्रास दिला. काँग्रेस महाभयंकर आहे. ते आपल्या लोकांचादेखील छळ करतात', असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
सांताक्रूझ येथे आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्यात प्रमुख पाहुणे या नात्याने मुख्यमंत्री बोलत होते. त्यांच्यासोबत भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार रुदोल्फ फर्नाडिस, सांताक्रूझ भाजप मंडळचे अध्यक्ष संदेश शिरोडकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
लोकांची उपस्थिती पाहून भारावलो
मुख्यमंत्री म्हणाले की, 'भर पावसात दोन हजारांपेक्षा जास्त लोकांची उपस्थिती पाहून मी भारावलो. त्यामुळे आगामी २०२७ च्या निवडणुकीत २७ जागांसह राज्यात डबल इंजिनचे सरकार येईल हे आता स्पष्ट झाले आहे. सबका साथ, सबका विकास या तत्त्वावरच भाजप सरकारने आतापर्यंत राज्यात काम केले. आम्ही मतदारसंघाच्या, राज्याच्या विकासासाठी काम करीत आहोत. लोकांचा विकास कसा करता येईल, यावर आम्ही भर दिला आहे. युवकांनी कौशल्य विकसित करावे, त्यांना रोजगार देण्याची जबाबदारी आमची आहे.
मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा : रुदोल्फ
आमदार रुदोफ्ल फर्नाडिस म्हणाले की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा नेहमीच पाठिंबा आम्हाला मिळाला आहे. त्यांच्याकडे कुठलेही काम घेऊन गेलो की पूर्ण होतेच. मतदारसंघातील अनेक विकासकामे त्यांच्यामार्फतच करण्यात आली आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानेच मतदारसंघाचा विकास करू शकलो. युवकांना नोकऱ्या मिळवून देऊ शकलो. यापुढेदेखील त्यांचे पाठबळ आम्हाला मिळेल, अशी अपेक्षा आहे.
केंद्राच्या ८० टक्के योजना लोकांपर्यंत
मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात वेगवेगळ्या योजना आम्ही राबविल्या आणि जवळपास १०० टक्के लोकांपर्यंत आम्ही योजना पोहचविल्या देखील. पण एवढ्यावरच समाधान न मानता केंद्र सरकारच्या १३ प्रमुख योजनांपैकी सुमारे ८० टक्के योजना १०० टक्के लोकांपर्यंत पोहचविल्या आहेत. असे करणारे गोवा हे पहिले राज्य ठरले आहे. या प्रमुख योजनेंपैकी पंतप्रधान आवास योजना, उज्वला योजना, वंदना योजना यासारख्या योजनांचा समावेश आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.