मुख्यमंत्रिपदापासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने रचले कुभांड; मंत्री माविन गुदिन्हो यांचा 'त्या' नेत्यांवर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 08:16 IST2025-08-26T08:15:53+5:302025-08-26T08:16:10+5:30
न्यायालयाच्या निकालानंतर दाबोळी मतदारसंघातील गुदिन्हो समर्थक कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.

मुख्यमंत्रिपदापासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने रचले कुभांड; मंत्री माविन गुदिन्हो यांचा 'त्या' नेत्यांवर आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को : काँग्रेस पक्षात असताना मी मुख्यमंत्री होऊ शकतो, असे लक्षात आल्याने काही नेत्यांनी मला अडकवण्यासाठी स्व. मनोहर पर्रीकर यांना वीज अनुदान घोटाळा झाल्याचे सांगत खोटी कागदपत्रे दिली. पर्रीकर यांनी माझा काहीच दोष नसल्याचे तेव्हा सांगून काही कांग्रेस नेत्यांनीच तुझ्याविरोधात मला कागदपत्रे पुरवली, असे सांगितल्याची माहिती पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.
काहीच दोष नसताना माझ्यावर विनाकारण २७ वर्षे वीज अनुदानात घोटाळा केल्याचा खोटा खटला चालला. याचा त्रास सोसावा लागला. कार्यकर्ते माझ्याबरोबर ठामपणे उभे राहिल्याने आणि देवाच्या कृपेनेच मला इतक्या वर्षांनंतर न्यायालयाने निर्दोष जाहीर केले. याचा मला मोठा आनंद झाला असे ते म्हणाले. सोमवारी (दि. २५) विशेष न्यायालयाने १९९८च्या कथित वीज अनुदान घोटाळ्यातून तत्कालीन वीजमंत्री आणि विद्यमान पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांना निर्दोष मुक्तता दिली.
न्यायालयाच्या निकालानंतर संध्याकाळी दाबोळी मतदारसंघातील गुदिन्हो समर्थक कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. नवेवाडे येथील गुदिन्हो यांच्या कार्यालयात त्यांचे पुष्पहार घालून आणि फटाके वाजवून कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले.
पत्रकारांशी बोलताना गुदिन्हो म्हणाले की, '२७ वर्षांनंतर मला न्याय मिळाला. कोणत्याच प्रकारचा घोटाळा झाला नसतानाच माझ्याविरोधात वीज अनुदानात घोटाळा झाल्याचा खोटा खटला घालण्यात आला होता. त्यावेळी पर्रीकर यांना मी काहीच केले नसताना माझ्याविरोधात हे प्रकरण का नोंद केले? असे विचारले. तेव्हा पर्रीकर यांनी, तू काहीच केले नसल्याचे मान्य करत तुझ्याच काही काँग्रेस नेत्यांनी तू मुख्यमंत्री होशील अशा भीतीतून कागदपत्रे आणून दिल्याची माहिती दिली होती.
माझ्याविरोधात काही काँग्रेस नेत्यांनी षडयंत्र रचले. मला विनाकारण संकटात टाकले. पण, कार्यकर्ते सतत माझ्याबरोबर ठामपणे राहिले. त्यामुळे मी आणखी शक्तिशाली झालो. विरोधात षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केलेल्या नेत्यांचा मी आभारी आहे.
गुदिन्हो म्हणाले की, 'मी काहीच चुकीचे केलेले नाही. देवाने माझ्यावर कृपा करून यातून निर्दोष सोडवले. मी गेली ४० वर्षे जनतेची सेवा करत आहे. समर्थक, कार्यकर्ते आणि मतदार माझ्याबरोबर आहेत. जे लोक सोबत राहिले त्यांचे आभार.