काँग्रेसचे आता संविधान रक्षण अभियान; सरकारचे अपयश गावांत मांडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2024 12:36 IST2024-11-27T12:35:55+5:302024-11-27T12:36:37+5:30
याप्रसंगी त्यांच्यासोबत उत्तर गोव्याचे जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर व श्रीनिवास खलप उपस्थित होते.

काँग्रेसचे आता संविधान रक्षण अभियान; सरकारचे अपयश गावांत मांडणार
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : काँग्रेसचे संविधान रक्षण अभियान आज, बुधवारपासून राज्यभर सुरू होणार असून पुढील ६० दिवस गावागावात बैठका घेऊन सरकारचे विविध आघाड्यांवरील अपयश लोकांसमोर मांडले जाईल व लोकांमध्ये जागृती केली जाईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी त्यांच्यासोबत उत्तर गोव्याचे जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर व श्रीनिवास खलप उपस्थित होते.
पाटकर म्हणाले की, 'आज सर्वसामान्य जनतेची नोकऱ्यांसाठी फसवणूक होत आहे. नोकऱ्यांच्या अमिषाने लोकांना अक्षरशः लुटले जात आहे. सर्वत्र भ्रष्टाचार फोफावला आहे. रस्त्यांची स्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. पेडणे ते पणजी रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. २० ते ३० टक्के कमिशन घेऊन रस्त्यांचे निकृष्ट बांधकाम केले जाते आणि त्याचे परिणाम लोकांना भोगावे लागतात. गावागावातील रस्ते मृत्यूचे सापळे बनलेले आहेत. कायदा सुव्यवस्था कोलमडलेली आहे. आरोग्य क्षेत्रात बजबजपुरी माजलेली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तसेच कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये एक्स-रे मशीन नाही. औषधांचा तुटवडा आहे. तसेच डॉक्टर उपलब्ध नाहीत. हायकोर्टाने कानउघाडणी करूनही सरकार सुविधा देऊ शकलेले नाही. गोव्यातील सामान्य जनतेचे पारंपरिक धंदे बुडालेले आहेत. शेंकमालक, मच्छिमार तसेच इतर लहान व्यवसायिक डबघाईस आलेले आहेत. खाणी कधी सुरू होतील याची स्पष्टता नाही. तब्बल दोन लाख अवलंबित खाणी बंद झाल्यानंतर काय करताहेत याचे कोणतेही ऑडिट झालेले नाही. ते कोणत्या परिस्थितीत जीवन जगताहेत याचे सरकारला सोयरसुतक नाही.'
प्रत्येक खात्यात भ्रष्टाचार
पाटकर म्हणाले की, 'वीज आणि पाणी पुरवठ्याच्या बाबतीतही प्रचंड गैरसोय आहे. सरकारच्या प्रत्येक खात्यात भ्रष्टाचार माजलेला आहे. परप्रांतीय धनाढ्य लोक गोव्यात जमिनी खरेदी करायला येतात. पेडणेसारख्या भागात उपनिबंधक कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जातात. राज्यातील कायदा, व्यवस्था पूर्णपणे कोलम- डलेली आहे. खून, मारामाऱ्या, बलात्कार वाढलेले आहेत. सरकारला या गोष्टीचे कोणतीही चिंता नाही. वरील अभियानात गावागावात लोकांसमोर या गोष्टी आम्ही उघडे पाडू.'