कॅसिनोप्रश्नी दिल्लीपर्यंत तक्रारी, सरकारची गोची
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 09:49 IST2025-05-14T09:49:20+5:302025-05-14T09:49:49+5:30
पेडण्यात ओलित क्षेत्राची जमीन दिली कॅसिनो कंपनीला; विरोधी पक्षांकडून सरकारी यंत्रणेवर जोरदार टीका, धारगळमध्ये साकारणार टाउनशीप

कॅसिनोप्रश्नी दिल्लीपर्यंत तक्रारी, सरकारची गोची
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: पेडणे तालुक्यात तिळारी जलसिंचन प्रकल्पांतर्गत अधिसूचित ओलित क्षेत्रातील लाखो चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन काढून सरकारने एका कॅसिनो कंपनीला कॅसिनो तथा टाऊनशीप सीटीसाठी दिल्याने लोकांमध्ये संतापाचे वातावरण तयार झाले आहे. याबाबत काहीजणांनी दिल्लीपर्यंत तक्रारी पोहचविल्या आहेत. या विषयावरून सरकारची गोची होऊ शकते, कारण सर्वच विरोधक या विषयावरून संघटित होऊ लागले आहेत.
सरकारने यापूर्वी लोकांचा विरोध असतानाही पेडण्यात सनबर्न फेस्टिव्हल केले. जी संस्कृती पेडणेत किंवा धारगळ परिसरात कधीच नव्हती ती संस्कृती व विकृती अट्टहासाने सरकार लादू पाहत आहे, याची कल्पना अनेक एनजीओंनाही आली आहे. ग्रामस्थांविरुद्ध पोलिस बळाचा वापर करून काही महिन्यांपूर्वी पेडण्यात सनबर्न फेस्टिव्हल केले गेले. आता पेडणे मतदारसंघातच जलसिंचन क्षेत्राची किंवा ओलित क्षेत्रातील तीन लाख चौरस मीटर जमीन काढून एका कॅसिनो कंपनीला दिली गेली आहे. याबाबतही विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारी पातळीवरून होऊ लागला आहे.
विरोधी आमदार युरी आलेमाव, कार्ल्स फेरेरा आदींनी या विषयावरून सरकारवर टीका केली आहेच, काही एनजीओ याबाबत लवकरच आंदोलन करू शकतात, अशी माहिती मिळाली. पेडणे तालुक्यात यापूर्वी आलेल्या प्रकल्पांमध्ये स्थानिकांना रोजगार संधी मिळालीच नाही. कॅसिनो टाऊनशीपमध्ये पेडणेकारांना नोकन्या मिळतील, असे गाजर दाखविण्याचा प्रयत्न होत आहे. कॅसिनो लॉबीसमोर सरकारी यंत्रणा झुकत आहे, याची जाणीव झाल्याने काहीजणांनी दिल्लीपर्यंत तक्रारी पोहचविल्या आहेत.
मांडवीत लवकरच मोठा कॅसिनो येणार
दरम्यान, पणजीतील मांडवी नदीतही एक फार मोठा कॅसिनो लवकरच येणार आहे. काँग्रेसने कॅसिनो गोव्यात आणले असे पूर्वी दावा करणारे सध्याचे काही राजकीय नेते गोव्यात सगळीकडेच कॅसिनोंचे जाळे पसरवू लागले असल्याने संताप व्यक्त होत आहे. पणजीत कॅसिनोंसाठीच जेटी व अन्य साधनसुविधा तयार केल्या जातात. मांडवी नदीत सात मजली कॅसिनो जहाज उभे होईल. ते ११२ मीटर लांब असेल, अशी माहिती भाजपमधीलही एका गटात अस्वस्थता निर्माण करू लागली आहे