खाण कंपन्यांकडून ११ वर्षे नुकसानभरपाई थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2025 10:02 IST2025-02-17T10:02:33+5:302025-02-17T10:02:52+5:30

किसान सभेचा आरोप : तीव्र आंदोलनाचा इशारा

compensation from mining companies outstanding for 11 years | खाण कंपन्यांकडून ११ वर्षे नुकसानभरपाई थकीत

खाण कंपन्यांकडून ११ वर्षे नुकसानभरपाई थकीत

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : खाण कंपनीतर्फे करण्यात आलेल्या खनिज उत्खननामुळे गेले अनेक वर्षे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बागायती कुळागरे व शेती, तळी प्रदूषित झाली आहेत. शेतांमध्ये मातीचा भराव गेल्याने शेती करणे कठीण बनले आहे. मात्र, कंपनीने २०१३ पासून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिलेली नाही. आता पुन्हा खाणी सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात वारंवार बैठका घेऊनही कंपनी योग्य प्रतिसाद देत नसल्याचा आरोप अखिल भारतीय किसान सभेच्या मये विभागाने केला.

शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत त्वरित नुकसानभरपाई न दिल्यास आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा दिला. कृष्णा गडेकर, नारायण खराडे, दत्ताराम कुडास्कर व इतर शेतकऱ्यांनी आपली व्यथा प्रसारमाध्यमांसमोर मांडली.

शेतकऱ्यांनी सांगितले की, 'यापूर्वी न्यायालयीन लढ्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली होती. मात्र, २०१३ पासून गेल्या ११ वर्षांत काहीही मिळालेले नाही. सध्या सरकारने खाणी सुरू केल्या आहेत. दररोज उत्खनन व वाहतूक सुरू आहे. शेतजमिनी प्रदूषित झाल्या आहेत. शेती, कुळागरे, जलसाठे, तळीमध्ये मातीचा भराव गेल्याने शेती करणे कठीण बनले आहे.

यासंदर्भात कंपनी व्यवस्थापनाशी वारंवार चर्चा करून बैठका घेऊनही कोणताही निर्णय झालेला नाही. वारंवार खाण व्यवस्थापनातर्फे न्यायालयीन लढाई सुरू असल्याचे सांगितले जाते. मात्र, आता शेतकरी हतबल झाले आहेत. शेतीवरच उदार निर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांवर संकट उद्भवले आहे. सरकारने याकडे तातडीने लक्ष द्यावे व २०१३ सालापासून थकीत असलेली नुकसानभरपाई शेतकऱ्यांना तातडीने वितरित करावी. यात दिरंगाई झाल्यास आम्ही आक्रमक भूमिका घेऊ, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

कोणतीही नुकसानभरपाई प्रलंबित नसल्याचा दावा

सेसा मायनिंग कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मालकीच्या भागधारकांसाठी २०१० ते २०१३ या कालावधीसाठी भरपाई देयके आणि मयेतील शेतकऱ्यांना पूर्ण रक्कम देण्यात आली असल्याचे 'सेसा वेदांता' कंपनीने स्पष्ट केले.

'सेसा वेदांता'ने म्हटले आहे की, 'एसएमसीएल' विरुद्ध नुकसानभरपाई प्रलंबित नाहीत आणि २०१३ पासून मये येथे कोणतेही खाणकाम केलेले नाही. तसेच, वेदांता लिमिटेडने २४ एप्रिलपासून डिचोली मायनिंग ब्लॉक १ येथे कामकाज सुरू केले आहे.

मयेतील शेतकऱ्यांबाबतची खाणकामाशी संबंधित कोणतीही भरपाई कंपनीकडे देय नाही. कंपनीने ब्लॉकच्या मये बाजूला अद्याप खाणकाम सुरू केलेले नाही, त्यामुळे भरपाईचा प्रश्न उदभवत नाही, असे स्पष्टीकरण सेसा वेदांता कंपनी व्यवस्थापनाने दिले.
 

Web Title: compensation from mining companies outstanding for 11 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा