भारत सुपरपॉवर होण्यासह दहशतवादाच्या समूळ उच्चाटनासाठी भाजप सत्तेत हवा: CM प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 08:03 IST2025-05-16T08:02:15+5:302025-05-16T08:03:06+5:30
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'ऑपरेशन सिंदूर' हे कोणत्या धर्माविरुद्ध किंवा कोणत्या जातीविरुद्ध नसून दहशतवादाविरुद्ध होते.

भारत सुपरपॉवर होण्यासह दहशतवादाच्या समूळ उच्चाटनासाठी भाजप सत्तेत हवा: CM प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, हणजूण : देश सुपरपॉवर करण्याबरोबरच सामान्य जनतेची सेवा आणि दहशतवादाच्या समूळ उच्चाटन करण्यासाठी भाजपचे सरकार पुन्हा सत्तेवर येणे गरजेचे आहे. याकरिता भाजप कार्यकर्त्यांनी सरकारच्या विविध योजना तळागाळांतील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्य करायला हवे. कार्यकर्त्यांना सरकारी योजनांची माहिती असावी, यासाठी कार्यशाळा घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
शिवोली मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा चिवार-हणजूण येथील पंचायत सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. सुरुवातीला मोहित चोपडेकर यांनी सर्वांचे स्वागत करून मंडळ समिती जाहीर केली, त्यानंतर खासदार तानावडे, आमदार लोबो यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण मांद्रेकर यांनी केले.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'ऑपरेशन सिंदूर'चे नेतृत्व आमच्या मुस्लिम भगिनीने केले. भारताची नारीशक्ती देखील देशाच्या रक्षणासाठी तत्पर असल्याचे यातून दिसून येते. ऑपरेशन सिंदूर हे युद्ध कोणत्या धर्मा किंवा कोणत्या जातीविरुद्ध नसून दहशतवादाविरुद्ध होते. या युद्धात फक्त दहशतवाद्यांचे तळ नष्ट करण्यात आले. या लढाईत कोणत्याही सामान्य जनतेला त्रास देण्यात आलेला नाही. यावेळी व्यासपीठावर राज्यसभा खासदार सदानंद तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो, शिवोली भाजप मंडळ अध्यक्ष मोहित चोपडेकर, शिवोली प्रभारी राजसिंग राणे, उत्तर गोवा जिल्हा पंचायत उपाध्यक्ष निहारिका मांद्रेकर, जिल्हा पंचायत सदस्य अनिशा तोरसकर, मोहन दाभाळे, मनोज कोरगावकर, लता परब उपस्थित होते.
भाजपचा इतिहास जाणून घ्या : नाईक
यावेळी बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी कार्यकर्त्यांनी कसे वागावे, सरकारच्या विविध योजना सामान्य जनतेपर्यंत कशा पोहोचवाव्यात याबद्दल मार्गदर्शन केले तसेच भाजपचा इतिहास नवीन कार्यकर्त्यांनी जाणून घ्यावा, असे आवाहन केले.
मोठी उपस्थिती
शिवोली मतदारसंघातील कार्यकर्त्यांसाठी आयोजीत करण्यात आलेल्या या मेळाव्यात खासदार सदानंद तानावडे, आमदार डिलायला लोबो यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी मंडळ भाजप पदाधिकारी, विविध पंचायतींचे सरपंच, उपसरपंच, पंच यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.