मुख्यमंत्र्यांना कामाचे व्यसन; पर्रीकरांचाही प्रभाव : सुलक्षणा सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 07:46 IST2025-03-20T07:44:52+5:302025-03-20T07:46:03+5:30
लोकमत एक्स्लुझिव्ह: स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा मुख्यमंत्री सावंत यांच्यावर मोठा प्रभाव आहे.

मुख्यमंत्र्यांना कामाचे व्यसन; पर्रीकरांचाही प्रभाव : सुलक्षणा सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा ६ वर्षांचा कार्यकाळ हा निश्चितच समाधानकारक आहे. मुख्यमंत्र्यांना कामाचे व्यसनच आहे. त्यामुळे त्यांच्याकडे कायम ऊर्जा असते व चेहऱ्यावर स्मितहास्य, अशी प्रतिक्रिया काल मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केली.
स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा मुख्यमंत्री सावंत यांच्यावर मोठा प्रभाव आहे. काम करत राहण्याचा गुण हा त्यातूनच आला असावा, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. 'लोकमत'ने विचारले असता सुलक्षणा सावंत म्हणाल्या की, आपण सहा वर्षे झाली असा उल्लेख करत नाही. वर्षे न मोजता गोव्यासाठी काम करणे, असा दृष्टिकोन आम्ही ठेवला आहे. मुख्यमंत्रिपदाद्वारे राज्याच्या सेवेची संधी मिळणे ही देवाची कृपा.
सुलक्षणा सावंत पुढे म्हणाल्या, 'पर्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद सावंत घडले. ते दिवसभर कामात असतात. रात्री १२ वाजताही गोव्यासाठी एखादे काम करण्याची जबाबदारी वाट्याला आली तर ते हसतमुखाने सामोरे जातात. ते कधी थकलेत असे दिसणारच नाहीत. कामातूनच त्यांना ही शक्ती मिळते. राजकीय समतोल साधत कधी-कधी त्यांना तारेवरची कसरत करावी लागते.'
राज्यात साधनसुविधा निर्माण व अन्य क्षेत्रांत सावंत यांनी वेगाने काम केले आहे. मुख्यमंत्र्यांनी यापुढेही असे काम करावे की, गोव्यातील युवकांना प्रेरणा मिळेल व आपणदेखील एक दिवस मुख्यमंत्री बनायला हवे, असे युवकांना वाटू लागेल. नवे नेतृत्व त्यातून तयार होईल. लीडर म्हणून सावंत यांनी गेली सहा वर्षे उत्तमरीत्या काम केले आहे. - सुलक्षणा सावंत, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी.