संपावर तोडग्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न; गार्ड संघटना, डीन व अधिकांऱ्यांची घेतली बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 11:26 IST2025-06-10T11:16:06+5:302025-06-10T11:26:18+5:30

डॉक्टरांच्या आठ ते नऊ प्रश्नांवर निर्णय झाल्याचा डॉ. प्रमोद सावंत यांचा दावा

cm attempt to find a solution to the doctor strike meeting held with guards organization dean and officers | संपावर तोडग्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न; गार्ड संघटना, डीन व अधिकांऱ्यांची घेतली बैठक

संपावर तोडग्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न; गार्ड संघटना, डीन व अधिकांऱ्यांची घेतली बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोमेकॉतील डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांच्या अपमान प्रकरणी राज्यातील वातावरण तापले आहे. सर्व स्तरातून या प्रकरणाचा निषेध सुरू असताना काल रात्री मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासोबत आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानी गार्ड संघटना, गोमेकॉचे डीन व अधिक्षकांची बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी 'या घटनेची पुनरावृत्ती होणार नसून डॉक्टरांनी संपावर जाऊ नये,' असे आवाहन केले.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, डॉक्टरांचे नऊ ते दहा प्रश्न होते. पैकी आठ ते नऊ प्रश्नांवर तोडगा काढलेला आहे. तसेच अशा घटनेची पुनरावृत्ती पुन्हा होणार नाही, अशी ग्वाही त्यांना मी दिली असून संपावर जाऊ नये, असे आवाहनही केले आहे. सावंत म्हणाले की, या बैठकीचे इतिवृत्त तयार करण्यास सांगितले असून आज मंगळवारी सकाळपर्यंत ते डॉक्टरांना सादर केले जाईल. हवे असल्यास मी प्रत्यक्ष येईन, असेही मी शिष्टमंडळाला सांगितले आहे.

आंदोलक डॉक्टर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी कॅज्युअल्टीमध्ये येऊन माफी मागावी या मागणीवर ठाम आहेत त्याबद्दल विचारले असता मुख्यमंत्र्यांनी काहीही उत्तर देण्याचे टाळले. विश्वजीत राणे यांनी ज्यांच्याशी गैरवर्तन केले ते गोमेकॉच्या कॅज्युअल्टी विभागाचे सीएमओ डॉ. रुद्रेश कुट्टीकर हेही बैठकीला उपस्थित होते. 

बैठक संपवून बाहेर पडताना पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु काहीही न बोलता ते निघून गेले. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्याविरुद्ध पणजी पोलिस स्थानकात अॅड. सेउला वाझ यांनी तक्रार नोंदविली आहे. यामध्ये त्यांनी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बेजबाबदारपणे आणि हिंसक वर्तन केल्याचे म्हटले आहे. ७ जून रोजी गोमेकॉ इस्पितळाच्या कॅज्युअल्टी विभागातील घटनेचा संदर्भ जोडण्यात आला आहे.

बैठक यशस्वी : बांदेकर

बैठकीनंतर गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांकडील बैठक फलदायी झाली असून संघटनेच्या बहुतांश मागण्या पूर्ण करण्याची तसेच आपण स्वतः आज मंगळवारी गोमेकॉच्या कॅज्युअल्टी विभागाला भेट देऊन डॉक्टरांशी बोलण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दर्शवली आहे. आरोग्यमंत्र्यांकडून माफीच्या मागणीचे काय? असे विचारले असता आरोग्यमंत्र्यांच्या भेटीबद्दल कोणतीही चर्चा झालेली नाही, असे डॉ. बांदेकर यांनी सांगितले.

आरोग्य मंत्री म्हणतात...

रविवारी रात्री उशिरा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी डॉ. कुट्टीकर आणि त्यांच्या कुटुंबियांची माफी मागितली होती. त्यावेळी त्यांनी डॉ. कुट्टीकर यांना त्या ठिकाणी येण्यास सांगितले होते, परंतु ते आले नाहीत. त्यामुळे डॉक्टर संघटनेच्या सदस्यांसमोरच आरोग्यमंत्र्यांनी माफी मागितली. काल सोशल मीडियावरून पुन्हा राणे यांनी माफी मागितली आहे. डॉक्टर वर्गाला दुखविण्याचा आपला हेतू नव्हता. आपले शब्द चुकले, डॉक्टरांनी काम बंद न ठेवता रुग्ण सेवा सुरू ठेवावी, असे राणे यांनी म्हटले आहे.

 

Web Title: cm attempt to find a solution to the doctor strike meeting held with guards organization dean and officers