मांडवीतील कॅसिनो बंद करा
By Admin | Updated: June 25, 2014 17:29 IST2014-06-25T17:28:57+5:302014-06-25T17:29:21+5:30
पणजी : कॅसिनो जहाजांमधील सांडपाणी मांडवी नदीत सोडण्यात येत असल्याने नदीच्या पाण्यातील प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचले आहे. नदीतील प्रदूषण मानवी जीवनाला घातक असून,

मांडवीतील कॅसिनो बंद करा
पणजी : कॅसिनो जहाजांमधील सांडपाणी मांडवी नदीत सोडण्यात येत असल्याने नदीच्या पाण्यातील प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचले आहे. नदीतील प्रदूषण मानवी जीवनाला घातक असून, सरकारने तरंगते कॅसिनो त्वरित बंद करावेत, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
गोवा प्रदूषण मंडळाने भाजपा सरकार सत्तेवर येण्यापूर्वी मांडवीतील पाण्याचा नमूना तपासून मांडवीत ‘कॉलिफॉर्म बॅक्टेरिया’चे प्रमाण मर्यादेपेक्षा ३३८ टक्के वाढले असल्याचे जाहीर केले होते. मात्र, आता प्रदूषण मंडळ हे प्रदूषण कॅसिनोंच्या मलनिस्सारणामुळे नसल्याचे सांगत आहे. या प्रदूषणामुळे पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी होत आहे. यामुळे पाण्यातील जैविक संपदेवर परिणाम होत असल्याचा दावा काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. उल्हास परब यांनी केला आहे.
मांडवी नदीच्या किनारी राहाणाऱ्या लोकांच्या आरोग्यावरही या प्रदूषणाचा परिणाम होऊ शकतो. तसेच मांडवीतील मासे खाल्ल्यासही प्रदूषणाचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकारने मांडवीतील कॅसिनो बंद करण्याबरोबरच पर्यावरण कायद्याअंतर्गत आरोपपत्र दाखल करावे, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.
दरम्यान, भाजपा सरकारने चोवीस तास पाणी व वीज देण्याचे आश्वासन दिले होते; पण आम आदमीला अजूनही पाणी आणि विजेसाठी त्रास सोसावे लागत आहेत. वीजमंत्री मिलिंद नाईक कुटुंबासमवेत स्वित्झर्लंड, मंत्री दयानंद मांद्रेकर अमेरिका व पाणीपुरवठ्याचा आधुनिक प्रकल्प गोव्यात उभारण्यासाठी व त्याचा अभ्यास करण्यासाठी मंत्री सुदिन ढवळीकर सिंगापूरचा दौरा करून आले आहेत. मंत्री अभ्यास दौऱ्यासाठी नव्हे केवळ सहलीसाठी परदेशात जातात, असा आरोप काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रतिमा कुतिन्हो यांनी केला.
रेल्वेचे भाडे महाग करून केंद्र सरकारने सर्वसामान्य लोकांवर संकट आणले आहे. सरकारचे कोणतेही धोरण सामान्य माणसाच्या उत्कर्षाचे नाही. आवश्यकता नसताना मांडवी उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे. जुवारी पुलावरून दिवसाला लाखो नागरिक ये-जा करत असतात. खचत चाललेल्या जुवारीबाबत सरकार कोणताही निर्णय घेत नाही. राज्याबरोबरच आता केंद्रातही परिवर्तनाचे वारे वाहू लागले असल्याचे कुतिन्हो म्हणाल्या. (प्रतिनिधी)