भाजप-मगोत 'ठिणगी'; वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी घेतली सामंजस्याची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2025 08:01 IST2025-01-03T08:00:08+5:302025-01-03T08:01:48+5:30
अर्थात या वादाबाबत वीजमंत्री तथा मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांनी तूर्त सामंजस्याची भूमिका घेतली आहे, त्यामुळे वाद वाढला नाही.

भाजप-मगोत 'ठिणगी'; वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी घेतली सामंजस्याची भूमिका
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: सत्ताधारी भाजप आणि सत्तेतील सहभागी म. गो. पक्ष यांच्यात फोंडा तालुक्यातील काही विषयांवरून संघर्षाची ठिणगी पडली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तसेच प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनीही या संघर्षाची दखल घेतली व एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. अर्थात या वादाबाबत वीजमंत्री तथा मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांनी तूर्त सामंजस्याची भूमिका घेतली आहे, त्यामुळे वाद वाढला नाही.
मडकई मतदारसंघात भाजपचे संघटनात्मक काम गेली अनेक वर्षे नीट होतच नाही. सदस्य नोंदणीची गाडीही पुढे गेली नाही. तिथे मगोपचे नेते ढवळीकर हेच गेली पंचवीस वर्षे निवडून येतात. ढवळीकर यांना बायपास करून काहीजण थेट मुख्यमंत्र्यांकडे जाऊन अलीकडे कामे करून घेऊ लागले आहेत. त्यामुळे संघर्षाची ठिणगी पडली. सुदिन ढवळीकर यांनी शिरोडा किंवा फोंडा मतदारसंघात आपले काम पूर्णपणे थांबवले आहे. कारण भाजपला दूखवू नये, अशी भूमिका त्यांनी स्वीकारली आहे, असे मगोपच्या काही कार्यकर्त्यांनी सांगितले. मात्र फोंड्यात बसून कुणी तरी मडकईत लुडबूड व हस्तक्षेप करत असल्याची मगोप कार्यकर्त्यांची भावना झाली आहे.
दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री सावंत यांनी बैठक घेतली. ढवळीकर यांनी भाजप कार्यकर्त्यांचीही कामे करावीत अशी चर्चा त्या बैठकीत झाली. तानावडे, नरेंद्र सावईकर उपस्थित होते. ढवळीकर यांचे मुख्यमंत्री सावंत यांच्याशी व तानावडेंशीही चांगले संबंध आहेत. पण सावईकर यांच्याशी त्यांचे सूर जुळलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांनाही कल्पना असल्याचे काही माजी आमदारांचे म्हणणे आहे. युतीचा धर्म हा भाजप व मगोप या दोघांनी पाळला तरच २०२७ ची निवडणूक ठीक जाईल. मगोपला डावलून भाजप निवडणूक लढवू शकणार नाही, असे मगोपच्या कार्यकर्त्यांना वाटते.
'नवीन वर्षात नव्या गोष्टी होतील.....'
नवीन वर्षात नव्या गोष्टी होतच राहतील, असे उत्तर देत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळ फेररचनेच्या प्रश्नावर स्पष्ट काही सांगण्याचे टाळले. मावळते वर्ष मंत्रिमंडळ फेररचनेच्या चर्चेतच सरले. नेमका फेरबदल कधी होणार आहे? असा प्रश्न बुधवारी रात्री पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना केला असता त्यांनी वरील उत्तर दिले. नवीन वर्ष सर्वांना सुखा-समाधानाचे जावो, अशी प्रार्थना करताना काही जणांना नवे वर्ष भरभराटीचे जावो, असेही ते म्हणाले.
सुदिन खात्याची कामे घेऊन भेटत असतात
मंत्री सुदिन ढवळीकर हे बुधवारी मुख्यमंत्र्यांना भेटले होते. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत मगोपसोबत युती करण्याची चर्चा सुरु आहे का? असा प्रश्न केला असता सावंत म्हणाले की, मगोप सरकारमध्ये घटक पक्ष आहे. मंत्री या नात्याने सुदिन अधूनमधून आपल्या खात्याच्या मागण्या घेऊन भेटतात तेव्हा साहजिकच अन्य विषयांवरही चर्चा होत असते. बुधवारीही ते मला भेटले तसेच भाजपच्या संघटनात्मक निवडणुका चालू असल्याने भाजपचे काही नेतेही भेटले.
मुख्यमंत्री भेटले आर्चबिशपना
दरम्यान, मुख्यमंत्री सावंत यांनी काल आर्चबिशप कार्डिनल फिलीप नेरी फेर्राव यांची आल्तिनो येथे भेट घेतली. दोघांमध्येही गोव्यातील विविध विषयांवर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी आर्चबिशपांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.