Christmas is a celebration of traditionalism, solidarity | पारंपारिकता, एकात्मता जपणारा सण नाताळ
पारंपारिकता, एकात्मता जपणारा सण नाताळ

म्हापसा : बदलत्या युगानुसार बदलती जीवनशैली तसेच जागतिकरणाच्या काळात आपले विविध सण पारंपारिकतेपासून दूर जात असले तरी गावातील गावपण राखून ठेवलेल्या लोकांनी आजही आपल्या या सणाची पारंपारिकता आजही जपून ठेवली आहे. मग तो चतुर्थीचा सण असो किंवा नाताळाचा. एकात्मतेचे प्रतीक असलेल्या समाजातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रीत आणणारा, धार्मिक एकात्मतेबरोबर एकमेकांशी असलेले सलोख्याचे नाते हितसंबंध ऋणानुबंध जपणाऱ्या आपल्या विविध सणांची पारंपारिकता जशी चतुर्थीला दिसून आली तशी आजही गावातून नाताळात कायम दिसून येते.    

गावातील पारंपारिकते व एकात्मतेचे उदाहरण म्हणजे गावात नाताळ सणाची पूर्व तयारी. ज्या पद्धतीने ख्रिश्चन बांधव चतुर्थीच्या सजावटीसाठी हिंदू बांधवांना सहकार्य करतात. त्याचप्रमाणे हिंदू बांधव ख्रिश्चन बांधवांना नाताळात सहकार्य करतात. अवघ्या पंधरा दिवसांवर येवून ठेपलेल्या या सणाची पूर्व तयारी जोर धरू लागली आहे. नाताळनिमित्त येशू ख्रिस्ताच्या जन्म झालेल्या गोठ्याच्या सजावटी सुरूझाल्या आहेत. प्रत्येकाच्या घरात गोठा बनवला जात असला तरी गावातील चर्च परिसरातील गोठा तर सर्वात मोठा व आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. चर्चमधील गोठ्याला आकार देताना त्यातून एक वेगळाच अनुभव व आनंद एकात्मतेचे प्रतीक अनुभवायला मिळते. एकात्मतेत मोठी ताकद असते या प्रमाणे कामही सोपी व सहज होऊन जातात. गोठा बनवण्याचे नियोजन झाल्यानंतर आराखडा तयार झाल्यानंतर प्रत्येक कामाची समानरित्या वाटणी केली जाते व त्यातून गोठा आकार घेत असतो.  

नाताळाच्या दिवसापासून ते नवीन वर्षापर्यंत चर्चच्या परिसरात भरगच्च असे विविध प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमांच्या तालमी किमान पंधरा दिवस तरी केल्या जातात. हे कार्यक्रम सुद्धा इतर धर्मियांच्या सहकार्याने सजवले नटवले जातात. नाताळात होणा-या कार्यक्रमात सुद्धा सहभागी होवून आपल्या कलेचे प्रदर्शन करीत असतात.
गावात तर सणाच्या पूर्वतयारीची मोठी गडबड सुरु असते. सणाला लागणारे विविध पदार्थ खास करुन करंजा बनवण्यासाठी एकमेकांच्या घरी जाऊन मदतीचा हात देण्याची प्रथा आजही रुढ झालेली आहे. वेळात वेळ काढून हे पदार्थ बनवण्यासाठी सहकार्य केले जाते.

संबंधीत वर्षात एखाद्या व्यक्तीच्या घरी दुर्घटना घडली असल्यास सणाचे पदार्थ बनवले जात नाहीत. अशावेळी तयार केलेले पदार्थ त्यांच्या घरी जाऊन त्यांना देण्याची प्रथा आजही पाळले जातात. काही लोक गरीबांच्या घरी किंवा वृद्धाश्रमात जाऊन दानधर्मावर भेट देत असतात. करंजा सोबत लाडू सुद्धा नाताळातील एक पदार्थ म्हणून त्याचा हल्लीच्या काळात वापरही केला जातो. प्रत्येकाला आनंद देणारा हा सण सामाजिक महत्व वाढवण्यासाठी प्रेरणादायी ठरत असतो. बरेच हिंदू लोक नाताळाला येशू ख्रिस्ताच्या जन्माच्यावेळी चर्चमध्ये प्रार्थनेत सुद्धा सहभागी होत असतात. नाताळाच्या दिवशी एकमेकांच्या घरी भेटी देवून सण साजरा करतात.  

Web Title: Christmas is a celebration of traditionalism, solidarity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.