Chief Minister's support for open defecation-free goa | गोवा हागणदारीमुक्त निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून समर्थन
गोवा हागणदारीमुक्त निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून समर्थन

पणजी : गोवा राज्याला हागणदारीमुक्त नुकतेच जाहीर करण्यात आल्याच्या निर्णयावर विरोधकांकडून टीका केली जात असली तरी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मात्र शुक्रवारी या निर्णयाचे समर्थन केले. गोमंतकीयांकडे  95 टक्के शौचालये आहेत आणि उर्वरित लोकांना आम्ही समुह शौचालयाची व्यवस्था करून देत आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, गोमंतकीयांकडे 100 टक्के शौचालये आहेत असा दावा आम्ही केलेला नाही. मात्र 95 टक्के गोमंतकीयांकडे निश्चितच शौचालये आहेत. कम्युनिटी शौचालये जिथे नाहीत, तिथे ती आम्ही तातडीने पुरवत आहोत. यापूर्वी अशी अनेक शौचालये पुरविली. आणखी कोणत्या भागात अशी शौचालये हवी असतील तर सरकार व्यवस्था करील. अन्य राज्ये हागणदारीमुक्त जाहीर होत आहेत. गोवा त्या तुलनेने खूप पुढे आहे व त्यामुळे गोव्याला हागणदारीमुक्त जाहीर करणो यात काहीच धक्कादायक नाही.

स्वच्छ भारत मिशनकडून गोव्याला नुकतेच हागणदारीमुक्त राज्य म्हणून जाहीर करण्यात आले. गोव्यात राहणारे अनेक मजुर आणि काही गोमंतकीयही अजुनही शौचालयासाठी जंगलांचा वापर करतात. यामुळे विरोधी काँग्रेससह अन्य अनेकांनी गोव्याला हागणदारीमुक्त जाहीर करण्याच्या निर्णयाविषयी आश्चर्य व्यक्त केले होते. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी कठोर टीका केली होती.

दरम्यान, पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनीही या निर्णयाचे समर्थन केले. मंत्री गुदिन्हो म्हणाले, की पूर्वी रस्त्याच्या बाजूला किंवा अन्यत्र लोक शौचाला बसत होते. तशी स्थिती आता नाही. आता प्रत्येक ठिकाणी शौचालये आहेत. काहींना भाटकार- मुंडकारांच्या वादांमुळे शौचालये मिळाली नाहीत तर काही मुंडकारांकडे शौचालयांच्या बांधकामांसाठी पुरेशी जागा नाही. आम्ही त्यावरही उपाय काढू पण प्रत्येकासाठी जर आम्ही थांबलो तर गोवा कधीच हागणदारीमुक्त राज्य म्हणून जाहीरच करता येणार नाही.

Web Title: Chief Minister's support for open defecation-free goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.