शिवरायांचे १२ किल्ले युनेस्कोच्या यादीत समाविष्ट हा ऐतिहासिक, अभिमानास्पद आणि गौरवशाली क्षण - CM प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 05:29 IST2025-07-12T05:28:40+5:302025-07-12T05:29:38+5:30
किल्ल्यांचे शत्रूस गूढ वाटणारे प्रवेशद्वार, संरक्षणाची रणनीती व स्थापत्यशास्त्रीय उत्कृष्टता ही जगात कुठेही सापडणार नाही, अशी मराठ्यांची अमूल्य देणगी आहे. हेच खरे.'

शिवरायांचे १२ किल्ले युनेस्कोच्या यादीत समाविष्ट हा ऐतिहासिक, अभिमानास्पद आणि गौरवशाली क्षण - CM प्रमोद सावंत
किशोर कुबल
पणजी : 'ऐतिहासिक, अभिमानास्पद आणि गौरवशाली क्षण,' अशा शब्दांत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट केल्याबद्दल अभिनंदन केले. हा केवळ महाराष्ट्रासाठी नाही, तर संपूर्ण भारतासाठी गौरवाचा क्षण आहे, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
युनेस्कोने 'अद्वितीय वैश्विक मूल्य' म्हणून ज्या किल्ल्यांचा समावेश केला आहे त्यात रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि तमिळनाडूतील जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, 'हिंदवी स्वराज्याचे प्रणेते, रयतेचे रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांनी केवळ भूभागावर राज्य केले नाही, तर लोकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले. त्यांनी उभारलेले किल्ले हे स्वराज्यनिर्मिती, रणनीती, स्थापत्य व स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. किल्ल्यांचे शत्रूस गूढ वाटणारे प्रवेशद्वार, संरक्षणाची रणनीती व स्थापत्यशास्त्रीय उत्कृष्टता ही जगात कुठेही सापडणार नाही, अशी मराठ्यांची अमूल्य देणगी आहे. हेच खरे.'
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की,'हिंदवी स्वराज्याचे अद्वितीय वैश्विक मूल्य आहे.या ऐतिहासिक क्षणासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो. विशेषतः मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मन:पूर्वक अभिनंदन व आभार. मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग व संस्कृती मंत्रालयाने सक्रिय पाठिंबा दिला तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारच्या अथक प्रयत्नांतून हे शक्य झाले.'
'छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी वारशाला ही जागतिक ओळख लाभणे हे आपल्या संस्कृतीचे आणि अस्मितेचे सर्वश्रेष्ठ सन्मानचिन्ह आहे., असे नमूद करून 'जय शिवराय ' या घोषणेने सावंत यांनी प्रतिक्रियेची सांगता केली आहे.