गोव्यात अंदाधुंदी उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 14:11 IST2025-12-08T14:11:01+5:302025-12-08T14:11:40+5:30
अलीकडच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात बळी जाण्याची गोव्यातील ही पहिलीच घटना आहे.

गोव्यात अंदाधुंदी उघड
हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' या नाईट क्लबमध्ये शनिवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला आणि ६ जण जखमी झाले. अलीकडच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात बळी जाण्याची गोव्यातील ही पहिलीच घटना आहे. गोव्यातील प्रशासकीय अंदाधुंदी या घटनेने उघड केली आहे. सरकारी यंत्रणांचे अपयश देशासमोर आले आहे. नाईट क्बलमधील या अग्नितांडवाने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. सर्वांत पहिला प्रश्न म्हणजे ही दुर्घटना घडली कशी? कोणाच्या चुकीमुळे घडली? ही दुर्घटना टाळता आली असती का? हा क्लब कायदेशीर होता का? त्याचे बांधकाम कायदेशीर होते का? नाईट क्लब चालू करायला लागणारे परवाने त्यांच्याकडे होते काय? या क्लबचे बांधकाम सीआरझेडच्या कक्षेत येत असल्याने तत्संबंधीचा दाखला, पर्यावरण दाखला, आरोग्य खात्याचा दाखला आदी दाखले मिळवून त्यांनी हा क्लब चालू केला होता का? यातले त्यांच्याकडे काहीही नव्हते, असे कळते.
हा क्लब खाजन लँडमध्ये असल्याने त्याला कोणतेच परवाने मिळू शकत नव्हते. मग हा क्लब कसा सुरू झाला? सकाळी जेव्हा या घटनेचे वृत्त सगळीकडे पसरले तेव्हा सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागली असेच सगळीकडे कारण गेले होते. पण जसा सूर्य उतरणीला लागला तसे या आगीचे कारण सिलिंडरचा स्फोट नव्हे, हे स्पष्ट झाले. पण जे कारण नंतर सांगितले जात आहे, त्याप्रमाणे आतषबाजीमुळे ही आग लागली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी चौकशीचा आदेश दिलेला आहे. अहवाल येईलच, पण अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून खूप प्रभावी उपाययोजना करावी लागेल. गोव्यातील मांडवी नदीत चालणारे कॅसिनो किती सुरक्षित आहेत, तिथे जर एखादी दुर्घटना घडली तर लोकांना पळायला तरी वाव आहे काय याचा आढावाही मुख्यमंत्र्यांना कधी तरी घ्यावा लागेल.
नाईट क्लब किंवा रिसोर्टचे बांधकाम हे नद्या व नाल्यांच्या तोंडावर केले जाते. हडफडे येथील घटनेमुळे एकूणच नाईट क्लबांमधील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. आग लागली तर काय करायचे याची काहीच व्यवस्था हडफडेच्या क्लबमध्ये किंवा आसपास नव्हती. त्यामुळेच तेथे उपस्थित असलेल्या लोकांचा व पर्यटकांचा गोंधळ उडाला. आग क्लबच्या पहिल्या मजल्यावर लागली, ती इतकी भडकली की लोकांना कुठून बाहेर जायचे तेच कळेना. त्यामुळे काही लोक बेसमेंटमध्ये घुसले. पण तेथे ते अधिक संकटात सापडले. कारण तेथून बाहेर पडायला वाटच नव्हती. तेथे इतका धूर भरला की तेथे असलेले लोक गुदमरून मेले.
खरे तर या क्लबचे बांधकामच अवैध होते. पंचायतीने हे बांधकाम पाडण्याची नोटीसही दिली होती. हे प्रकरण पंचायत संचालनालयाकडे गेले होते. तेथे त्यांना स्थगिती मिळाली होती. ही स्थगिती कशी मिळाली, हाही एक प्रश्न आहे. स्थगितीचे पुढे काय झाले? कारण स्थगिती ही तात्पुरती असते. बांधकामाच्या परवानगीबरोबरच त्यांच्याकडे अन्य कुठलेही परवाने नव्हते असे सांगण्यात येत आहे.
मुख्य म्हणजे या क्लबचे बांधकाम पाण्यातच होते. क्लबमध्ये आत जाण्यासही अगदी छोटीच वाट होती. पाण्याच्या बंबाच्या गाड्याही आत नेता आल्या नाहीत. त्या ४०० मीटर लांब ठेवाव्या लागल्या. या अरुंद आणि एकमेव वाटेमुळेच लोकांना बाहेर पडता आले नाही. आता या आगीमुळे आणि झालेल्या नुकसानीमुळे हे स्पष्टच झाले आहे की अग्निसुरक्षेची व्यवस्था इथे नव्हती. बांधकामाच्या बाबतीत ते अवैध होते हे स्पष्टच झाले होते. कारण पंचायतीने त्यांना तशी नोटीस पाठवली होती.
क्लब अशा ठिकाणी आहे की तेथे कुठल्याच बांधकामाला आणि आस्थापन उभारायला परवानगीच मिळू शकत नाही. मग हा क्लब सुरू कसा झाला होता आणि इतके दिवस तो चालू कसा होता? याचे उत्तर कोण देणार? याचा अर्थ कोण तरी यात सामील आहे, ज्याच्या आशीर्वादाने तो चालू होता. त्याचा शोध घेतला पाहिजे. आता ही दुर्घटना घडल्यामुळे हा प्रकार लक्षात आला आहे.
अशा प्रकारचे अनेक क्लब, रेस्टॉरंटस्, हॉटेलस् असतील ज्यांची अशीच स्थिती असू शकते. सर्वांचे सुरक्षा ऑडिट होणे आवश्यक आहे. सरकारचे नेहमीच वरातीमागून घोडे असतात. घटना घडून गेल्यानंतर सगळी त्यांची धावपळ चालते. शिरगावच्या जत्रेत जी चेंगराचेंगरी झाली होती, तेव्हाही असेच झाले होते. गर्दीच्या ठिकाणी घ्यायची काळजी तेथे घेतली गेली नव्हती, म्हणून ती दुर्घटना घडली होती. गोव्याचे प्रशासन त्या दुर्घटनेनंतरही सुधारलेले नाही.