नरकासूर प्रतिमांच्या दहनाने गोव्यात तेजोमय दिवाळीला आरंभ 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 10:42 AM2017-10-18T10:42:34+5:302017-10-18T10:44:12+5:30

गोव्यातील प्रत्येक गाव, खेडे आणि शहरात तयार केल्या गेलेल्या उंच, लहान-मोठ्या अशा हजारो नरकासूर प्रतिमांचे बुधवारी साडेचार ते पाचच्या सुमारास वाजतगाजत दहन करण्यात आले आणि तेजोमय दीपावलीला गोव्यात आरंभ झाला.

Celebration of Diwali in Goa | नरकासूर प्रतिमांच्या दहनाने गोव्यात तेजोमय दिवाळीला आरंभ 

नरकासूर प्रतिमांच्या दहनाने गोव्यात तेजोमय दिवाळीला आरंभ 

googlenewsNext

पणजी : गोव्यातील प्रत्येक गाव, खेडे आणि शहरात तयार केल्या गेलेल्या उंच, लहान-मोठ्या अशा हजारो नरकासूर प्रतिमांचे बुधवारी साडेचार ते पाचच्या सुमारास वाजतगाजत दहन करण्यात आले आणि तेजोमय दीपावलीला गोव्यात आरंभ झाला. गोवा आणि कोकणातील काही भागांमध्ये नरकासूर प्रतिमा तयार  करण्याची प्रथा आहे. गेले महिनाभर खपून गोव्यातील युवकांनी हजारो नरकासूर प्रतिमा तयार केल्या होत्या. पर्यटकांसाठी ही नरकासूर प्रतिमा आकर्षण ठरल्या.

सोमवारी रात्री गोवाभर जोरदार पाऊस पडला होता पण युवकांचा उत्साह कमी झाला नाही. रात्रीच्यावेळी खपून आणि जागरण करून गोमंतकीयांनी तयार केलेल्या हजारो नरकासूर प्रतिमांचे बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास दहन केले गेले व मग गोमंकीयांच्या घरासमोर पणत्या पेटल्या व रंगीबेरंगी आकाशदिवे लागले.  नरकासूर म्हणजे राक्षस. त्याचा श्रीकृष्णाने वध केला अशी कथा आहे. फटाक्यांची आतषबाजी करत गोमंतकीयांनी बुधवारी पहाटे सगळ्या नरकासूर प्रतिमा जाळल्या व अंधारावर प्रकाशाने मात केली असा संदेश दिला गेला. काही भागांत नरकासूर प्रतिमांच्या स्पर्धाही पार पडल्या.

गोमंतकीयांची घरे सध्या पाहुण्यानी भरून गेली आहेत. एकमेकाला दिपवालीच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत.  उजेड आणि आनंदाने घरे उजळून गेली आहेत. मुलांचा आनंद तर ओसंडून वाहत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना दिपावलीची सुट्टी आहे. घरांमध्ये पोहे आणि अन्य गोडधोड पदार्थ तयार करण्यास आरंभ झाला आहे.

दरम्यान, गोव्यातील एक ज्येष्ठ मंत्री सुदिन ढवळीकर यांनी गोव्यात नरकासूर स्पर्धा आयोजित करण्यास आक्षेप घेतला आहे. नरकासुरांऐवजी श्रीकृष्ण प्रतिमा तयार केल्या जाव्यात आणि श्रीकृष्ण प्रतिमांच्या स्पर्धा आयोजित केल्या जाव्यात असे आवाहन मंत्री ढवळीकर यांनी केले आहे. नरकासुराचे स्तोम वाढल्यामुळे दिपावली सणाचा खरा अर्थ  आजच्या नव्या पिढीला कळत नाही असे मंत्री ढवळीकर यांनी म्हटले आहे.

Web Title: Celebration of Diwali in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.