Carnival in Goa, but for whom? | गोव्यात कार्निव्हलची धूम, पण कोणासाठी?

गोव्यात कार्निव्हलची धूम, पण कोणासाठी?

- राजू नायक

गोव्यात आजपासून कार्निव्हलची धूम सुरू झाली आहे. नगरे सुशोभित झाली आहेत. वृत्तपत्रांमध्ये मोठमोठय़ा जाहिराती झळकत आहेत. मद्य कंपन्यांच्या जाहिरातबाजीकडे सरकारने हेतुपुरस्सर दुर्लक्ष चालविले आहे. कॅसिनो कंपन्यांनी खुलेआम प्रायोजकत्व दिले आहे. एकूण काय, ‘खा, प्या, मजा करा’ हा किंग मोमोचा संदेश भाजपा सरकार मन:पूर्वक अमलात आणते आहे.

मला आठवते, कार्निव्हलचे व्यावसायीकरण सुरू झाले त्यावेळी- २०-२५ वर्षापूर्वी हिंदुत्ववाद्यांचा तो एक प्रमुख मुद्दा असायचा. समाजाला वाममार्गाला लावणारा अणि बीभत्सतेला राजमान्यता देणारा हा उत्सव आहे. त्याला सरकारी पाठिंबा मिळता कामा नये. सध्या प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार ज्या पद्धतीने तो रेटते आहे, ते पाहिले की वाटते, २० वर्षापूर्वी भाजपा खरोखरीच अशी होती?
कार्निव्हल ख्रिस्ती संघटनांना तरी कुठे हवा आहे? चर्च धर्मसंस्थेने कधीच या उत्सवापासून फारकत घेतली आहे. आज ज्या पद्धतीने हा महोत्सव भरवला जातो, त्याच्याशी धर्माचा काहीही संबंध नाही, असे चर्चने जाहीर करून टाकले आहे. चर्च आपल्या जागाही त्यासाठी वापरायला मनाई करते.

वास्तविक ३५-४० वर्षापूर्वी गोव्यात पारंपरिकदृष्टय़ा साजरा होणारा ‘इंत्रुज’ व आजचा संपूर्ण व्यावसायिक बनलेला कार्निव्हल यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. ‘इंत्रुज’ला इथल्या मातीचा सुगंध होता. लोककला, लोकनाटय़, कौटुंबिक मेजवान्या व आनंद वाटण्याचा तो उत्सव होता. नवीन लोकनाटय़े बसविली जात. ती ख्रिस्तीबहुल भागात घरोघरी जाऊन सादर केली जात. गाण्यांचे जलसे होत. रंग उधळला जाई.

आपल्याकडच्या शिगम्याचेच ते ख्रिस्ती रूपांतर होते. परंतु गोव्याच्या पर्यटनाला हव्यास निर्माण झाला व ब्राझिलहून त्याचे आणखी भ्रष्ट स्वरूप येथे आयात झाले. येथे निर्माण झालेल्या पर्यटनाच्या सुखसोयींना पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ही ‘नशा’ हवी होतीच. वास्तविक स्वस्त मद्य, स्वच्छंदी जीवन, मुली व मांस-मच्छी असे आज जे गोव्याचे भडक चित्र रंगविले जाते, त्याचे मूळ कार्निव्हलच्या या आजच्या स्वरूपात आहे. दुर्दैवाने, गोवा सरकारने मद्यावर जबर कर बसविल्यामुळे तर, कार्निव्हलच्या अशा प्रसिद्धीची त्यांना आता अधिकच आवश्यकता भासू लागली आहे.

स्थानिक लोकांना कार्निव्हलचे सध्या काहीही सोयरसुतक राहिलेले नाही. आजचा कार्निव्हल केवळ पर्यटकांसाठी असतो. विदेशी पर्यटकांनी तर कधीच पाठ फिरविली आहे. असले कार्निव्हल त्यांना युरोपमध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. त्यासाठी ‘महागडा’ गोवाच का? कार्निव्हलच्या प्रसिद्धीमुळे येऊ शकतील ते देशी पर्यटक! तेही आंबटशौकीन. दारू पिऊन शॅक -हॉटेलात धिंगाणा घालणारे, स्थानिक मुलींना छेडणारे, विदेशी महिलांचा मानभंग करणारे! गोवा सध्या ज्या स्वरूपाचा बनलाय- त्याचे हे विकृत भयंकर रूप आहे! या अशा गोव्याने सुसंस्कृतपणा कधीच गमावला आहे. त्यामुळे कार्निव्हल काळात कुटुंबवत्सल लोक गोव्यात का म्हणून येतील?

Web Title: Carnival in Goa, but for whom?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.