काणकोणातील समुद्राचे निळे पाणी अचानक झाले हिरवे, तज्ज्ञांनी दिली धोक्याची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2020 02:23 PM2020-12-05T14:23:27+5:302020-12-05T14:27:30+5:30

Canacona Goa : समुद्रातील पाण्यातील ऑक्सिजन कमी होत असल्याने मासे आणि समुद्रातील इतर जीव जंतूंसाठी ते घातक ठरु शकते

Canacona coast become green in past few days affected tourism activities | काणकोणातील समुद्राचे निळे पाणी अचानक झाले हिरवे, तज्ज्ञांनी दिली धोक्याची सूचना

काणकोणातील समुद्राचे निळे पाणी अचानक झाले हिरवे, तज्ज्ञांनी दिली धोक्याची सूचना

Next

सुशांत कुंकळयेकर

मडगाव - गोव्यातील अत्यंत निसर्गरम्य परिसर म्हणून ज्याला ओळखले जाते त्या काणकोण परिसरातील समुद्राचे निळे पाणी अकस्मात हिरवे झाल्याने स्थानिकांमध्ये आश्चर्य पसरले आहे. या अचानक झालेल्या बदलाने पर्यटकांनीही इथल्या समुद्र किनाऱ्याकडे पाठ फिरवली आहे.

सुरुवातीला हा प्रकार केवळ आगोंद येथे आढळून आला होता. त्यानंतर पालोळे, पाटणे, कोळंब, राजबाग या ठिकाणीही असा प्रकार दिसून आला. मागच्या कित्येक वर्षात प्रथमच असा प्रकार आपण पाहिल्याचे स्थानिक नागरसेवक दिवाकर पागी यांनी सांगितले. या पाण्याला कुजका वास येत असल्यामुळे पर्यटकांनीही किनाऱ्याकडे पाठ फिरवली. मात्र कालपासून हे पाणी निवळू लागले आहे अशी माहिती सायमन रिबेलो या अन्य एका व्यावसायिकाने दिली.

समुद्राचे पाणी अकस्मात हिरवे होण्यामागे समुद्रातील शेवाळ (अल्गल ब्लूम्स) असे सांगण्यात येत असले आणि त्यामागे तापमान वाढ हे मुख्य कारण असे सांगितले जात असले तरी अशा शेवळाची वाढ प्रक्रिया न केलेले सांडपाणी मोठ्या प्रमाणावर समुद्रात सोडल्याने होऊ शकते. समुद्रात असे बदल होणे ही धोक्याची सूचना असून सारे काही आलबेल नाही हेच त्याच्यातून सूचित होत असल्याचे मत मरिन झूओलॉजिस्ट डॉ. मनोज बोरकर यांनी व्यक्त केले.

डॉ. बोरकर यांनी पाण्यातील जीवसृष्टीवर अभ्यास केलेला असून ते म्हणाले, मानवी मैला आणि इतर प्रकारच्या सांडपाण्यावर हे शेवाळ वाढते. ते वाढण्यामागे जागतिक पर्यावरण बदल हे जरी कारण असले तरी सांडपाण्याच्या कारणाकडे दुर्लक्ष करता कामा नये असे ते म्हणाले. शेतात पीक येण्यासाठी जर अती प्रमाणात खत वापरले आणि हे खतमिश्रित पाणी पावसाने वाहून समुद्रात आले तरी त्यामुळे असे शेवाळ वाढू शकते याकडे त्यांनी लक्ष वेधले.

बुधवारी सकाळी काणकोण तालुक्यातील आगोंद किनाऱ्यावर हिरव्या पाण्याच्या लाटा येऊ लागल्यानंतर सगळेच आश्चर्यचकीत झाले होते. या पाण्याला एकप्रकारचा घाण वास येत होता.

यावर एनआयओचे संचालक सुनील कुमार सिंग यांनी खुलासा करताना हा बदल 'अल्गल ब्लूम्स' (शेवाळ)मुळे असल्याचे म्हटले होते. महाराष्ट्र आणि कर्नाटक किनारपट्टीवर असे शेवाळ सापडते. हे शेवाळ विषारी नसल्याने मानवाला ते हानिकारक नाही पण त्यामुळे समुद्रातील पाण्यातील ऑक्सिजन कमी होत असल्याने मासे आणि समुद्रातील इतर जीव जंतूंसाठी ते घातक ठरु शकते असे सिंग यांनी सांगितले.

मात्र या घटनेकडे तसेच या दिवसात गोव्यातील समुद्रात होणाऱ्या इतर बदलाकडे गंभीरपणे पाहून अभ्यास करण्याची गरज डॉ. बोरकर यांनी व्यक्त केली. गोव्यातील समुद्रावर मोठ्या प्रमाणावर जेली फिश मिळतात हीही एक धोक्याची सूचना असून काही ठिकाणी समुद्राच्या लाटातून निल किरणे ( बायो ईल्युमिन्स) दिसू लागल्याने समुद्राच्या पाण्यात विपरीत बदल होत असल्याच्या गोष्टीवर शिक्कामोर्तब होत असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Canacona coast become green in past few days affected tourism activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा