कर्नाटक पोलिसांविरूद्ध कारवाई करता येईल का? एजींकडून पडताळणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 22:17 IST2018-08-09T22:17:22+5:302018-08-09T22:17:54+5:30
म्हादई पाणीप्रश्नी पाहणी करण्यासाठी गोव्याचे जलसंसाधन खात्याचे अभियंते कर्नाटकमधील कणकुंबी येथे गेल्यानंतर बेळगावच्या पोलिसांनी त्यांना जी वागणूक दिली त्याविषयाची जलसंसाधन खात्याने व एकूणच सरकारने खूप गंभीरपणो दखल घेतली आहे.

कर्नाटक पोलिसांविरूद्ध कारवाई करता येईल का? एजींकडून पडताळणी
पणजी : म्हादई पाणीप्रश्नी पाहणी करण्यासाठी गोव्याचे जलसंसाधन खात्याचे अभियंते कर्नाटकमधील कणकुंबी येथे गेल्यानंतर बेळगावच्या पोलिसांनी त्यांना जी वागणूक दिली त्याविषयाची जलसंसाधन खात्याने व एकूणच सरकारने खूप गंभीरपणो दखल घेतली आहे. जलसंसाधन मंत्री विनोद पालयेकर यांनी राज्याचे अॅडव्होकेट जनरल दत्तप्रसाद लवंदे यांच्याशी याविषयी चर्चा केली. कारवाई करण्याबाबतची शक्यता आम्ही पडताळून पाहत आहोत, असे एजी लवंदे यांनी गुरुवारी येथे सांगितले.
जलसंसाधन खात्याचे कार्यकारी अभियंते, सहाय्यक अभियंते व अन्य अधिकारी मिळून एकूण आठ जणांचे पथक दोन जीपगाडय़ांमधून म्हादईच्या खो-यात गेले होते. खानापुर तालुक्यातील कणकुंबी येथे त्यांना बेळगावच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना इनस्पेक्शन बंगल्यामध्ये गेले. मंत्री पालयेकर यांनी व एजी लवंदे यांनी लोकमतला सांगितले की, हा प्रकार खूप गंभीर आहे. गोव्याचे आठ अधिकारी जणू काही गुन्हेगार असल्याप्रमाणो पोलिसांसोबत त्यांना उभे करून त्यांचे फोटो काढले गेले. त्यांना इनस्पेक्शन बंगल्यामध्ये ठेवून मोबाईलवर बोलू दिले नाही.
लवंदे म्हणाले, की मंत्री पालयेकर हे आपल्याशी बोलले असून आपण अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांच्याशी बोलून याविषयी पुढील कारवाई कोणती करता येईल याबाबत निर्णय घेईन. म्हादई नदीचे पाणी कसे व कुठे वळवले गेले आहे ते पाहण्यासाठी अधिका-यांनी जाणे ही त्यांची जबाबदारी आहे. गोव्याच्या अधिका-यांनी कणकुंबी येथे जाऊन कोणताच गुन्हा केलेला नाही. तो काही क्रिमिनल ऑफेन्स नव्हे. बेळगावच्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याची गरजच नव्हती. त्यांचे गुन्हेगार असल्यासारखे फोटो काढणोही गैर आहे.
मंत्री पालयेकर म्हणाले की हा विषय सरकारने खूप गंभीरपणो घेतला असून कारवाई व्हायला हवी. आपली मुख्यमंत्री पर्रिकर यांच्याशी बोलणी होऊ शकली नाहीत. कारण ते अमेरिकेला गेले. मुळात कर्नाटकने पाणी वळविल्याने मलप्रभेच्या ठिकाणी सगळे पाणीच आहे व गोव्याच्या बाजूने खालच्या ठिकाणी प्रवाह आटले आहेत.
दरम्यान, गोवा व कर्नाटकमधील मूळ पाणी प्रश्नाविषयी म्हादई पाणी तंटा लवादाचा निवाडा येत्या आठवडय़ात निश्चितच येईल असा विश्वास अधिका-यांनी व्यक्त केला आहे.