केडर जोडो मोहीम; भाजप प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर दामू नाईक सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2025 12:03 IST2025-01-29T12:02:44+5:302025-01-29T12:03:35+5:30

भाजपच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यावर दामू नाईक यांनी पक्ष बळकट करण्यासाठी जोरदार मोहीम सुरू केली

cadre jodo abhiyan damu naik joins after taking charge as bjp state president | केडर जोडो मोहीम; भाजप प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर दामू नाईक सरसावले

केडर जोडो मोहीम; भाजप प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर दामू नाईक सरसावले

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजपच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यावर दामू नाईक यांनी पक्ष बळकट करण्यासाठी जोरदार मोहीम सुरू केली असून पक्षापासून दूर गेलेल्यांना पुन्हा जवळ करण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे. त्यासाठी अशा कार्यकर्त्यांना त्यांच्या घरी जाऊन भेटीगाठी घेण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दामू नाईक यांची त्यांच्या घरी जाऊन घेतलेली भेट ही सहज घडलेली घटना आहे की पुढे घडणाऱ्या घटनांची नांदी आहे, याचा विचार करायला लावणारी वाटचाल दामू यांनी सुरू केली आहे. मागील आठवड्यात त्यांनी कुडचडे मतदारसंघात भेट दिली. स्वागत, कौतुक वगैरे औपचारिकता बाजूला सारून त्या ठिकाणी असलेल्या जुन्या कार्यकर्त्यांना जाऊन ते भेटले. तेथील भाजपचे जुने कार्यकर्ते आणि पाच वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले प्रदीप नाईक यांच्या घरी ते गेले. त्यांच्यासह प्रसन्न भेंडे, सुशांत नाईक, मारुती नाईक, ओंकार वस्त, शशिकांत वडावकर आणि इतर कार्यकर्त्यांनाही ते भेटले. जुन्या कार्यकर्त्यांनाही ते भेटले.

आठवण ठेवणे आनंददायक

याविषयी 'लोकमत'शी संवाद साधताना प्रदीप नाईक म्हणाले की नवीन अध्यक्षांनी आमची आठवण ठेवून आम्हाला भेटायला येणे हे आमच्यासाठी भावनिक आणि आनंदाची बाब आहे. नवीन अध्यक्ष केडरला सांभाळणार हा संदेश यातून जात आहे हे यातून सिद्ध होते असेही ते म्हणाले. यापुढे नवीन आणि जुन्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितल्याचे नाईक म्हणाले. त्यामुळे भाजप आगामी काळात जुन्या कार्यकर्त्यांना जवळ करेल असे दिसून येत आहे.

कार्यकर्त्यांना मिळाले संकेत

प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर आगामी काळात पक्षापासून आपली धोरणे काय असतील याविषयीचे संकेत विविध माध्यमातून दिले आहेत. पक्षाची भक्कम बांधणी करण्याच्या दृष्टीने त्यांच्या हालचाली सुरू आहेत.

पार्सेकर यांच्या भेटीनंतर

भाजपचे गोव्यातील संस्थापकांपैकी एक असलेले माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दामू नाईक यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या घरी जाऊन घेतलेली भेट ही बरीच चर्चेत राहिली. नवीन अध्यक्षांचा पक्ष उभारणीचा दृष्टिकोन कसा असेल याविषयी आता कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाल्याचे दिसून येते.

 

Web Title: cadre jodo abhiyan damu naik joins after taking charge as bjp state president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.